नागपूर : नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) पार पडलेल्या आरक्षण सोडतीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. रेशमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या सोडतीत प्रभाग क्रमांक १८(ब) आणि १८(क) तसेच ३१(क) आणि ३१(ड) या प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये तीनपैकी प्रत्येकी दोन सर्वसाधारण महिला नगरसेवक निवडून येणार आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, या सोडतीत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा विविध वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १५ आणि १९ या दोन्ही प्रभागांमध्ये ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) यांच्यासाठी प्रत्येकी दोन जागा राखीव झाल्याने या समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरक्षणाबाबतच्या हरकती आणि सूचनांसाठी नागरिकांना संधी देण्यात आली आहे. आरक्षणाचे प्रारूप सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून, १७ ते २४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांना आपली मते, सूचना किंवा हरकती सादर करता येतील. या हरकती महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात प्रत्यक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यानंतर सर्व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीमुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, विविध राजकीय पक्षांनी या आरक्षणाच्या प्रारूपावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
