नागपूर: जेमतेम पंचविशीच्या आतील बंगळुरूच्या दोन तरुणांना केंद्रिय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने तीन किलोग्रॅम एम्फेटाईन या अत्यंत घातक अमली पदार्थांची तस्करी करताना मुद्देमालासह अटक केली. जिल्ह्यातील भागेमारी पथकर नाक्यावर गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी केलेल्या तपासणीत डीआरआयच्या पथकाने या दोन तस्करांना ताब्यात घेतले. बंगळुरू येथील रहिवासी असलेले हे दोघेही दिल्लीहून बंगळूरूकडे एका खासगी बसने प्रवास करत होते.
गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ तस्करी विरोधात मोहीम उघडलेल्या डीआरआयची ही एम्फेटाईन ड्रग्जच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ४० लाख रुपये आहे.
नेमकी घटना काय?
नागपूर मार्गे देशातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप पोचवली जाणार असल्याचा सुगावा डीआरआयच्या पथकाला लागला होता. त्या आधारे पथकाने बुधवारी नागपूर जिल्ह्यातील भागेमारी पथकर (टोल) नाक्यावर नाकाबंदी केली. अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे एका खासगी बसला अडवले. बसमधील प्रवाशांच्या गर्दीत अगदी सर्वसामान्य दिसणारे, २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे दोन तरुण पथकाच्या नजरेत आले. संशयावरून त्यांच्या बॅगची झडती घेतली असता, त्यात महागाडं आणि प्राणघातक मानलं जाणारे ‘एम्फेटामाईन’ ड्रग्ज आढळले.
डीआरआय पथक घेत आहे पुरवठा साखळीचा शोध…
अधिकाऱ्यांनी त्वरित ड्रग्ज जप्त करून दोघांनाही ताब्यात घेतले. हा साठा नेमका कुणी दिला होता आणि बंगळुरूमध्ये तो कुणापर्यंत पोहोचवला जाणार होता, याचा तपास आता सुरू आहे. अमली पदार्थांचे आंतरराज्यीय रॅकेट चालवणारे मुख्य सूत्रधार स्वतः नेहमी पडद्यामागे राहतात आणि जाळ्यात ओढतात. त्यामुळे पैशाच्या मोहापोटी हे दोघे तरूण केवळ वाहक बनले की त्यांचाही टोळीत सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
पुरवठा साखळी रडारवर, तस्करांबाबत गुप्तता…
सध्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा आणि संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेतला जात असल्याने पकडलेल्या दोन तरुण ड्रग्ज तस्करांसदर्भात कोणताही तपशील डीआरआयच्या पथकाने अद्याप जाहिर केलेला नाही.
यापूर्वीही नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई….
डीआरआयच्या पथकाने अलिकडेच गेल्या महिन्यात नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर एका महिलेच्या बॅगमधून दिड किलोग्रॅम एम्फेटाईन अमली पदार्थ पकडण्यात आला होता. या महिलेनेही बॅगमध्ये चोर कप्पा तयार करत तिथे हा अमली पदार्थ लपवून ठेवला होता. या प्रकरणाचा अद्याप तपासही पूर्ण झालेला नसताना तीन किलोग्रॅम एम्फेटाईन अमली पदार्थ तस्करी रोखण्यात यश आल्याने नागपूरमार्गे होणारी अमली पदार्थ तस्करी पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे.
नेमके काय पोलीस आयुक्त काय म्हणाले…
“एम्फेटामाईन हे कृत्रिम उत्तेजक अमली पदार्थ आहे. ते मानवी मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट व घातक हल्ला करते. याच्या वापराने तरुण पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची जोखीम असते. समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे. हे जाळे वेळीच उध्वस्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.
