नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) नागपूर प्रादेशिक पथकाने आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश करत सलग दोन कारवायांत तब्बल १,२५१ किलो अमलीपदार्थ (गांजा) जप्त केला. सुमारे ६.२५ कोटी रुपये बाजारमूल्याच्या या अमली पदार्थासह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यात मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे.
डीआरआयने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ओडिशा–आंध्रप्रदेश सीमेवरून मध्यप्रदेश–राजस्थान सीमेच्या दिशेने जाणारे बोलेरो पिकअप वाहन अडवले. झडतीदरम्यान ५३ गोणपाटांच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेली १४२ पॅकेजेस आढळली. त्यातून ७२९ किलो गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा कच्च्या आल्याच्या पोत्यांमध्ये कुशलतेने दडवण्यात आला होता. सुमारे ३.६४ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल, वाहन आणि आच्छादनासाठी वापरलेला माल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्यांपैकी एक जण यापूर्वीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून तो बराच काळ फरार होता.
याआधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील भगिमाहरी टोल प्लाझाजवळ ओडिशाहून येणारा एक ट्रक अडवण्यात आला होता. ट्रकमध्ये कुलर, टेबल फॅन आणि ब्लँकेट्सच्या मालाखाली १०० पॅकेजेसमध्ये ५२२ किलो गांजा लपवण्यात आला होता. सुमारे २.६१ कोटी रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणीही दोघांना अटक करण्यात आली.
दोन्ही कारवाया अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (एनडीपीएस) अंतर्गत करण्यात आल्या. ओडिशा–आंध्रप्रदेश सीमेलगतच्या भागातून गांजाची खरेदी करून तो मध्यप्रदेशमार्गे राजस्थानसह उत्तर भारतात पोहोचवण्याची टोळीची कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाहतुकीदरम्यान भाजीपाला, घरगुती उपकरणे आदी कायदेशीर मालाच्या आड गांजाची तस्करी केली जात होती.
सलग आणि समन्वित कारवायांमुळे आंतरराज्य अमली पदार्थ जाळ्यावर मोठा आघात बसल्याचे डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ या ध्येयाशी सुसंगतपणे अमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तपास सुरू असून या साखळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
