नागपूर : शिवसेनेच्या शिंदे गटातील योगेश गोन्नाडे नागपूर महापालिकेतील उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु आईचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतांना स्मशानघाटावर त्यांचा पक्षाकडून एबी फार्म पोहचला. त्यानंतर अंत्यविधीकरून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचले. या घटनेबाबत आपण जाणून घेऊया.
वत्सलाबाई नामदेवराव गोन्नाडे (८७) असे दगावलेल्या आईचे नाव आहे. त्या चंद्रपूरातील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत. वस्तलाबाईचा सोमवारी मृत्यू झाला. त्यापूर्वीपर्यंत योगेश हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम धावपळ करत होते. परंतु आईच्या मृत्यूनंतर अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंगातून शिवसेना (शिंदे गट)चे स्थानिक नेते योगेश गोन्नाडे यांना जावे लागले.
आई मृत्यूशय्येवर असताना पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार नाही, अशी मानसिकता झाल्याने त्यांनी उमेदवारीची अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र या दुःखद प्रसंगात शिवसेनेने आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याची आठवण ठेवत मानवी संवेदनशीलतेचा परिचय दिला. योगेश गोन्नाडे यांच्या आईचे अंत्यसंस्कार सुरू असतानाच, थेट स्मशानभूमीत पक्षाच्या प्रतिनिधींनी जाऊन त्यांना उमेदवारीसाठी आवश्यक असलेला एबी फॉर्म दिला.
हा क्षण केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत हृदयस्पर्शी ठरला. आईचे अंतिम संस्कार आणि इतर सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडल्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी दुःखावर मात करत जबाबदारी स्वीकारली. दुपारी तीन वाजण्यास काही मिनिटे शिल्लक असतानाच ते नागपूर महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयात पोहोचले आणि प्रभाग क्रमांक पाचमधून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला.
योगेश गोन्नाडे यांचे म्हणने काय ?
या घटनेबाबत लोकसत्ताशी बोलतांना योगेश गोन्नाडे यांनी भावना व्यक्त केल्या. “कुटुंबात असा कठीण प्रसंग असताना मला मिळालेली उमेदवारी हा पक्षाचा आणि माझ्या दिवंगत आईचा आशीर्वाद आहे,” असे ते म्हणाले. आज एका बाजूला आईच्या जाण्याचे अपार दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला संकटाच्या वेळी पक्षाने साथ दिल्याचे समाधानही असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राजकारणात अनेकदा गणिते, समीकरणे आणि स्पर्धा चर्चेत असतात; मात्र या घटनेमुळे नातेसंबंध, निष्ठा आणि संवेदनशीलता यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचेही योगेश गोन्नाडे यांनी सांगितले.
