भाजप-काँग्रेसकडून आचार संहितेला ‘खो’!

उत्तर नागपुरातील लष्करीबाग मराठी उच्च प्राथमिक शाळेत आचारसंहिताचा भंग झाल्याचे दिसून आले.

महापौर प्रवीण दटके यांच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजप, काँग्रेससह इतर काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांना ‘खो’ दिल्याचे चित्र होते.

 

महापौरांच्या प्रभागात ‘मत चिठ्ठी’च्या बुथवर पक्षाच्या झेंडय़ांचा वापर

महापौर प्रवीण दटके यांच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजप, काँग्रेससह इतर काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांना ‘खो’ दिल्याचे चित्र होते. दक्षिणमूर्ती चौकावरील महापौरांच्या बंगल्यासमोर भाजपने पक्षाचे झेंडे व फलक लावून उभारलेल्या मंडपामध्ये व्होटर लिस्टचे वाटप केले, तर दत्त मंदिराजवळ एक टेबल लावून काँग्रेसनेही स्वतचे चिन्ह असलेले बॅनर लावून मत चिठ्ठीचे वाटप केले. प्रभागात आचार संहितेचा भंग होत असतांनाही याकडे सगळयच यंत्रणेचे दुर्लक्ष झाले.

महापौर प्रवीण दटके हे प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढत असल्याने त्याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. प्रभागात मंगळवारी काँग्रेस-भाजपसह सगळ्याच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळावी म्हणून विविध क्लृप्ती लढवल्या जात होती. सगळ्याच उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना घरातून बाहेर काढण्यासह त्यांना विविध मतदार केंद्रात पोहोचवण्याकरीताही मदत करत होते. निवडणुकीत मतदाराचे नाव व केंद्र शोधून देण्याकरिता भाजप- काँग्रेससह विविध उमेदवारांनी मत चिठ्ठी देण्याकरिता मंडप उभारून व लहान टेबल लावून व्यवस्था केली होती. नियमानुसार या टेबलावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह व झेंडे लावता येत नाही. परंतु महापौर प्रवीण दटके यांच्या बंगल्याच्या समोर भाजपने उभारलेल्या मंडपात झेंडे व बॅनर लावून मत चिठ्ठी देण्यात आली. काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या घरा जवळील दत्त मंदिराजवळच्या टेबलवर काँग्रेसचे चिन्ह लावून मत चिठय़ा दिल्या जात होत्या. परंतु याकडे सगळ्या शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या.

मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कुठलीही वाहने ठेवू नये, असे आदेश असताना सतरंजीपुरामधील प्रभाग क्रमांक २१ मधील ठाकरे विद्यालयातील मतदान केंद्राच्या परिसरात वाहने ठेवली जात होती. मात्र, पोलिसांचे त्याकडे लक्ष नव्हते. हिवरी नगर, वैशाली नगर, कामाक्षी नगर या भागातील मतदान केंद्राच्या शंभर मीटर आता राजकीय पक्षाची होर्डीग लागलेले होते. गायत्री कॉन्व्हेंट या शाळेत तर एका उमेदवाराचे पोस्टर बघायला मिळाले. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी ते शाळेतील खोलीत नेऊन ठेवले. वनदेवीनगरातील एका मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार मतदान केंद्रात ये जात करीत असताना त्यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने त्या ठिकाणी काही वेळ तणाव आणि बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी दोघांना शांत केले आणि सर्वाना परिसरातून बाहेर काढले. झेंडा चौक परिसरातील शिवाजी नगर आणि धावडे मोहल्लामध्ये उमेदवार मतदान केंद्रात सारखी ये जा करीत होते.

प्रभाग-११ मध्ये जाफरनगर परिसरात ब्ल्यू डायमेंड स्कूलमधील मतदान केंद्राच्या बुथ क्रमांक ६९ वर एक युवक हा मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये प्रचार करून मतदान कुणाला करायचा, हे सांगत होता. त्याचा प्रकार अपक्ष उमेदवार राकेश हरिशंकर तिवारी यांच्या लक्षात आला आणि त्यांनी बुथ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या घटनाक्रमामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संबंधित युवक हा एका उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून बुथ ७० मध्ये बसलेला होता. तेथून बाहेर पडून तो रांगेतील उभ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार करताना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते.

उत्तर नागपुरात वाहनांनी नियम तोडले

उत्तर नागपुरातील लष्करीबाग मराठी उच्च प्राथमिक शाळेत आचारसंहिताचा भंग झाल्याचे दिसून आले. येथील मतदान केंद्रावर १०० मीटरच्या परिसरात वाहने लावण्यात येत होती. बाकावर बसून पोलीस कर्मचारी भ्रमणध्वनी संचाशी खेळत होते तर विविध पक्षाचे कार्यकर्ते दुचाकी आणि ऑटोरिक्षात बसून गप्पा मारत होते. ई-रिक्षा, ऑटोरिक्षावर मतदारांना अगदी प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात येत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur elections 2017 code of conduct violations by congress bjp in nagpur

ताज्या बातम्या