नवमतदारांचा कुठे उत्साह, कुठे लालफित शाहीचा फटका!

पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्कंठा होती आणि आता मतदान केल्यानंतर स्वत:चे महत्त्व कळले.

प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्याचा आनंद आगळा

प्रथम मतदानाचा हक्क बजावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविद्यालयीन युवक-युवतींना ही संधी मिळाली.अनेकांनी मताधिकाराचा हक्क बजावण्याचा आनंद घेतला तर अनेकांना मतदार यादीत त्यांचे नाव शोधताना अडचणी आल्याने संताप व्यक्त केला.

नवमतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे म्हणून निवडणूक आयोगाने प्रथमच महाविद्यालय पातळीवर विशेष मोहीम राबविली. जास्तीत जास्त युवकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजवावा ही त्या मागची भूमिका होती. या निवडणुकीत नवमतदारांचा कौलही महत्त्वाचा ठरणार असल्याने त्यांचा या निवडणुकीतील सहभागाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. काही ठिकाणी या मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला तर काही ठिकाणी त्यांना प्रशासकीय लालफितशाहीचा फटका बसल्याचे दिसून आले.

काही महिन्यांपूर्वी आठरा वर्षे पूर्ण झाले आणि मतदार यादी नाव नोंदवले. त्यानंतर ऑनलाईन मतदार यादी तपासली. त्यात मतदार म्हणून नाव होते. त्यामुळे वहिनीसोबत मतदानाला आले. परंतु मतदान केंद्रावरील यादीत नाव नाही. त्यामुळे मी मतदान न करताच परत जात आहे, असे नागसेन आदर्श कन्या विद्यालयात मतदान करण्यासाठी आलेल्या आणि मेकोसाबाग येथील रहिवासी सबिना म्हणाल्या.

पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्कंठा होती आणि आता मतदान केल्यानंतर स्वत:चे महत्त्व कळले. राजकारण फारसे कळत नाही, पण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर आपणही समाजाचा एक भाग आहोत आणि आपले नेतृत्त्व करणारा उमेदवार काय करत आहे आणि काय नाही हे कळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे, अशी प्रतिक्रिया बी फॉर्मच्या पहिल्या वर्षांला असलेली ऐश्वर्या घारपुरे आणि आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षांला असलेल्या प्रीती केदार यांनी सांगितले.

त्याचवेळी हर्ष मोदी या तरुणाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मतदान केल्यानंतरचा आनंद दिसून येत होता. आतापर्यंत राजकारणात जे काही चालले त्यावर ठामपणे मत मांडता येत नव्हते, पण आता तो हक्क मिळाला आहे. त्यामुळे कुठे काही चूक होत असेल तर त्यावर मी ठामपणे मत व्यक्त करू शकतो, असे तो म्हणाला.

प्रथमच मतदान करणाऱ्या प्रभाग क्रमांक २१ वरील एकोनवीस वर्षीय सोनाली चेपटे म्हणाली की, समज आल्यापासून प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छतेचे अनेक प्रश्न बघत आली आहे. या समस्या वेळीच सोडवण्याकरिता योग्य व्यक्ती निवडून यावा म्हणून मतदान करणे गरजेचे आहे. त्याकरिता मतदान केले. मोमीनपुरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रथमच मतदान करणारा आकीब झमन म्हणाला की, चुकीचा व्यक्ती निवडून येऊ नये म्हणून मतदान केले असून प्रत्येकाने आपला अधिकार बजावण्याची गरज आहे.

प्रभाग क्रमांक १७ सद्गुरुवाडी मतदान केंद्रावर राजू गायधने यांनी पॅनल पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आमच्या वस्तीतून उभा असलेल्या  उमेदवाराला आम्ही ओळखून आहोत मात्र प्रभागातील इतर तीन उमेदवारांचा आणि आमचा काहीही संबंध येत नाही. मात्र, त्याला देखील आम्हाला मतदान करावे लागले हे मला पटले नाही. त्यामुळे पूर्वी असलेली वार्ड पद्धतीच हवी होती असे गायधने मतदान करून आल्यावर बोलले.

पूर्व नागपुरातील अनेक मतदान केंद्रावर नवीन मतदार दिसून आले असताना त्यात पूर्व नागपुरातील प्रभाग २३ मधील छाप्रुनगरमधील शाळेत रश्मी मेंधवानी या युवतीने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. वाठोडा भागातील प्रभाग २४ मधील बुथ क्रमांक ३५मध्ये महापालिकेच्या शाळेतील एका मतदान केंद्रावर ८० वषार्ंची आजी आणि २० वर्षांची त्यांची नात असलेल्या काळबांडे कुटुंबातील दोन्ही सदस्यांनी एकाचवेळी मतदान केले. केडीके कॉलेज मतदान केंद्रावर नवीन मतदारांमध्ये उत्साह असला काही मतदान केंद्रावर त्यांना कोणाला मतदान करावे हे कळत नव्हते.

मुख्य प्रवाहात आल्याचे समाधान

पहिल्यांदा मतदान करण्यास मी फार उत्सुक होते. वर्तमानपत्रात आणि वॉट्स अ‍ॅपवर फिरणारे मॅसेज बघून माझा उत्साह शिगेला पोहोचला होता. पहिल्यांदाच चार मतदारांना पत देण्याची प्रक्रिया असल्याने माझ्या वडिलांना मला मतदानाला येण्यापूर्वीच मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे मी ते यशस्वीपणे पार पडले. मतदान केल्यानंतर आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे समाधान मिळाले.

दिशा घोष (प्रभाग ३६) 

हिरमोड झाला

मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना अडचणी आल्या. मात्र, मतदान केंद्रात मतदान केंद्राधिकाऱ्यांना प्रत्येकाला डेमो द्यावा लागला. याविषयी मतदारांमध्ये प्रभागनिहाय जागृती केली असती एवढा त्रास झाला नसता. प्रत्येकाला मशीनवर लावलेले बॅलेट समजावून सांगावे लागतात. त्यामुळे फारच वेळ लागतो. तरीही मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्सुकता दिसून येते. प्रथम मतदान करणाऱ्यांमध्ये फारच उत्साह होता. मात्र, मतदान केंद्रावर गेल्यावर यादीत नावच न सापडल्याने त्यांचा हिरेमोड झाला.

नीलिमा राऊत, वेळेकरनगर

मतदान करण्यात अडचणी

माझे मतदान सोमवारी क्वार्टरच्या राष्ट्रीय विद्यालयात असल्याचे संकेतस्थळावर दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात मतदान विश्वकर्मानगरातील श्रीनिकेतन शाळेत होते. प्रवासाचे साधन आणि नेटचा वापर करून आम्ही आमचे मतदान केंद्र शोधले. मात्र, ज्यांना ते शक्य नाही, अशांनी काय करायचे,  ५ जानेवारीला आयोगाची यादी  अद्ययावत केल्याचे दिसत आहे. मात्र, ती अद्ययावत नसल्याचे आम्हाला झालेल्या त्रासावरून दिसून येते.

– अक्षय अरविंद डाखोरे

नाव शोधण्यात अडचण

पहिल्यांदा मतदानाचा आनंद निराळा असल्याचे मत व्यक्त केले. सकाळी महाविद्यालयात जाण्यापूर्वी मी अनेक केंद्रांवरील मतदार यादीत माझे नांव शोधले मात्र ते दिसून आले नाही. तेव्हा निराश होऊन मी महाविद्यालयात गेल्यावर माझ्या वडिलांनी प्रभागातील अनेक मतदार केंद्र पिंजून काढल्यावर नाव मिळाले अन् मला महाविद्यालयातून बोलावून घेतले. शहारत विकास कामे झाली पाहिजे आणि युवकांना रोजगार मिळावा हे लक्षात ठेवून मी माझा उमेदवार निवडेल.

– अदिती अगस्ती, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur elections 2017 first time voters in nagpur nagpur voter list