मतदार याद्यांतील घोळ कायम

पश्चिम नगापूरमध्ये विद्यापीठ कॅम्पस परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांची चांगलीच धावपळ होत होती.

 

नावे गायब झाल्याने अनेकांचा संताप; हक्क न बजावता परत जाण्याची वेळ

मतदार यादी अद्ययावत असावी, जर नसेल तर त्यासाठी महापालिकेला आयुक्तांना जबाबदार धरले जाईल, अशी तंबी आयोगाने देऊनही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिकेच्या निवडणुकीतही याद्यांतील त्रुटी कायम राहिल्याने अनेकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही. केवळ प्रचार आणि प्रसारावर प्रशासनाने भर दिला. याद्या दुरुस्त न केल्याने हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.

यादीत नाव नसणे, ज्या भागात मतदार राहतात तो भाग सोडून इतर भागातील यादीत नाव असणे, अनेक वेळा मतदान करणाऱ्या मतदारांची नावे वगळणे असे प्रकार या निवडणुकीतही दिसून आले. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.

मध्य नागपुरातील मस्कासाथच्या वयोवृद्ध कुंभारे यांनी नाव मिळत नसल्याने शेवटी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. नाईक तलाव परिसरातील मनिराम सहारे यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत होते. यावेळी मिळाले नाही असा त्यांचा आरोप होता.  प्रभाग २२ मध्ये सर्वेश्वर मंदिराजवळ नोटाचे बटन सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांबरोबर मतदारांची बाचाबाची झाली.

पश्चिम नगापूरमध्ये विद्यापीठ कॅम्पस परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांची चांगलीच धावपळ होत होती. या केंद्रावर पाच खोल्यांमध्ये मतदान होते आणि पाचही खोल्या पाच दिशेला असल्याने मतदार धावपळ करत त्यांच्या चिठ्ठीवरील खोली क्रमांक शोधत होते. मकरधोकडा येथील मतदान केंद्रावर अनेकांची नावे मतदार यादीतच नव्हती. त्यामुळे काहींनी भ्रमणध्वनीचा आधार घेतला तर बुधवर बसून असलेले कार्यकर्ते त्यांचे नाव संगणकावर शोधण्याचा प्रयत्न करत होती. या केंद्रावरील सईबाई चाफले या साठी उलटलेल्या महिलेने एकूणच निवडणूक प्रक्रियेला शिव्या देत शेवटी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला.

पूर्व नागपुरातील अनेक प्रभागात मतदारांच्या नावात मोठय़ा प्रमाणात घोळ दिसून आला आला. पत्नीचे नाव होते तर पतीचे नाव नाही तर वडिलांचे नाव एका मतदान केंद्रावर मुलांचे नाव दुसऱ्या केंद्रावर बघायला मिळाले. लक्ष्मण जनबंधू यांचे नाव आदितवार दरवाजा शाळेत मुलगा सुरेश जनबंधू यांचे नाव जामदार शाळेतील मतदान केंद्रातील एका बुथवर दिसून आले. याशिवाय शहरातील वर्धमानगरातील प्रभाग क्रमांक २३ मधील अग्रवाल कुटुंबातील चार सदस्यांजवळ ओळखपत्र होते. मात्र, त्यांचे मतदार यादीत नव्हते त्यामुळे मतदानापासून त्यांना वंचित राहावे लागले. पूर्व नागपुरात अनेक केंद्रावर मतदार यादीचा घोळ बघायला मिळाला.

दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रभाग क्रमांक १६ च्या मतदारांना यंदा मतदानासाठी चांगलीच कसरत करावी लागली. प्रगती कॉलनी येथील प्रगती विद्यालयात मतदानाला आलेल्या मतदारांचे नाव यादीत नसल्याने नागरिकांना बऱ्याच चकरा माराव्या लागल्या. अनेक वर्षांपासून या बुथवर मतदान करणाऱ्या मतदारांची विभागणी दुसऱ्या मतदार केंद्रावर करण्यात आल्याने अनेकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी सकाळच्या सत्रात सकाळी ९:३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी केवळ ९.१४ टक्के राहिली. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी २०.१० टक्क्यांपर्यंत पोहोचली. मात्र, त्यानंतर मतदानाने जोर पकडला.

उत्तर नागपुरात प्रशासनाने मतदार यादीतील केलेल्या घोळामुळे हजारो मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. बुद्धनगरातील एका ७२ वर्षीय वृद्धाला त्याचा फटका बसला.  विरधी बलबिरसिंग प्रिमसिंग यांनी (७२) हे सर्वप्रथम उत्तर नागपुरातील शिक्षक सहकारी बँकजवळील मतदान केंद्रावर गेले. त्यांनी याच मतदान केंद्रावर लोकसभा आणि विधानसभेच्यावेळी मतदान केले होते. परंतु तेथील मतदान यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे पाचपावली येथील सिंधी हिंदी महाविद्यालयात गेले. तेथेही त्यांचे नाव सापडले नाही. त्यांना कुणीतरी सांगितले. आसीनगर झोन कार्यालयाजवळील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळेत नावे असू शकते, त्यामुळे तेथे तिकडे गेले. परंतु तेथेही त्यांचे नाव सापडले नाही. शेवटी ते मतदान न करताच घरी परतले.

मतचिठ्ठय़ा बुथवरच !

मतचिठ्ठय़ा मतदारांच्या घरी पोहोचवून देण्याचे आदेश आयोगाचे असताना आणि त्याचे पालन करण्याची हमी महापालिका प्रशासनाने दिली असतानाही निम्म्यापेक्षा अधिक मतचिठ्ठय़ा (व्होटर स्लीप) वाटण्यातच आल्या नाहीत. महापालिकेचे कर्मचारी बुथवर या चिठय़ा घेऊन बसले होते. पण त्याची मतदारांना माहिती नव्हती, त्यांना विचारणा केली तर कर्मचारी मोबईल अ‍ॅपवर नाव शोधा असे सांगत होते. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार केंद्रावर महापालिकेचे कर्मचारी तर लोकांनी त्यांच्याक डे  येऊच नव्हे म्हणून आडोशाच्या जागी बसले होते. चिंचभवनातही असाच प्रकार पाहायला मिळाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur elections 2017 jumble in nagpur voter list nagpur voter