नागपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून मॅपिंग न झालेले व नाव, वयात तफावत असणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. आजारी व वृद्धांना प्रत्यक्ष हजर न राहता घरच्या व्यक्तींना कागदपत्रांसह सुनावणीला पाठविता येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
त्यांना सांगितले की, सर्वाधिक मतदार नागपूर शहरातील आहेत. नागपूर शहरात २४ लाख ४७ हजार ८२ मतदार होते. या एसआयआर मोहिमेत १५ लाख २५ हजार २०४ मतदारांचे अर्ज संगणीकृत करण्यात आले. यातील २ लाख ६४ हजार ९४५ मतदारांमध्ये तांत्रिक विसंगती असून २ लाख ९३ हजार ५०२ मतदारांचे २००२ च्या मतदारीनुसार मॅपिंग झाले नाही. अशा ५ लाख ५८ हजार ४४७ जणांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीसाठी संबंधित मतदारांना काही कागदपत्रही सादर करावे लागणार आहे. आजारा आणि वृद्ध मतदाराला प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहणे फारच अवघड ठरणारे आहे. परंतु अशा व्यक्तींन प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यापासून सूट मिळणार आहे.
महिरे यांनी सांगितले की, नोटीस आल्यानंतर संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्र मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना व्हॉट्सॲपवर दिले तरी चालतील. त्यांचे त्याच प्रमाणे त्यांनी सुनावणीसाठी आपल्या घरच्या व्यक्तीला पाठवले तरी चालेल. घरी कुणीच नसलेत एखाद्या व्यक्तीला सुनावणीसाठी प्राधिकृत करता येईल. प्राधिकृत केल्याचे साधे लेखी दिले तरी चालेल. परंतु सुनावणी सर्वांची होईल. एखाद्याने बनावट प्राधिकृत पत्र दिले किंवा खोटी माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांना सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. रचना इंदूरकर, उपजिल्हाधिकारी अमोल कुंभार, सचिन कुमावत, विविक साळुंखे, गणेश मरकडे, शिल्पा सोनाले, प्रशांती माने आदी उपस्थित होते.
