प्रद्युम्न सहस्रभोजनी

नागपूर शहरात उल्लेखनीय असे फक्त १० तलाव आहेत (जे मागील लेखात आले आहे). त्यापैकी लेंडी तलाव सोडला तर बाकी सगळे मानवनिर्मित आहेत, एक १९११ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेला गोरेवाडा, बाकी अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीचे. त्यानंतरच्या तथाकथित प्रगतीत आपण नवीन तलाव निर्माण केले नाहीत. दूरवरच्या धरणांतील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शहराकडे वळवले, आणि इथल्या तलावांचा संकोच करून तिथे लेआऊट टाकण्यात भूषण मानले. तीच कथा नागनदीकाठच्या तुळशीबाग, बेलबाग, रेशीमबाग किंवा तलावांलगतच्या सक्करदरा, पारडी ह्या भोसलेकालीन बागांची.

तलाव, नद्या, बागा, टेकड्या, झाडे आणि इतर मोकळ्या जागा, यांचे शहरामध्ये काय महत्त्व असते? तर या निसर्गप्रणालींमुळे शहराला स्थितिस्थापकत्व (आपत्तींवर मात करण्याची लवचिकता) प्राप्त होते. ती नसल्यामुळे प्रदूषण, अतितापमान, भूजल पातळीत घट, जैवविविधतेचा नाश, अतिवृष्टी, पूर या आपत्ती शहरांसाठी नेहमीच्या होतात. या सगळ्यांवरील बरेचसे उपाय (आपण करू दिले तर) निसर्ग स्वतःच करतो; वनस्पती प्राणवायू, अन्न, थंडावा इत्यादी पुरवतात ज्याची आपल्याला गरज असते; आपण उत्सर्जित केलेले कर्बाम्लवायू, विष्ठा इत्यादी – वनस्पती वापरत असतात; पण अशी चक्रीय व्यवस्था नैसर्गिक संतुलन बिघडवून प्रदूषणातच राहायचे अशी शपथ घेतल्यावर शहरांमध्ये नष्ट होते. या पार्श्वभूमीवर शहरातले तलाव, नद्या, बागा आणि मोकळ्या जागा यांच्या शोकांतिकासुद्धा नागपूरच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून समजून घेणे आवश्यक आहे.
सगळ्यात जुनी, रंजक, पण दुःखद कहाणी जुम्मा तलावाची!

ब्रिटिशांनी १८६४ मध्ये सेंट्रल म्युझियम निर्माण केले. त्याकाळी ‘अजब बंगला’ पाहायला कोण येणार होते? गोंड?..मराठे?.. पण हे त्यांसाठी नव्हतेच मुळी. मध्य भारतातून काय-काय लुटता येईल त्या नमुन्यांचे हे संग्रहालय होते. लूट घेऊन जायला रेल्वेही आणली होती. हे नमुने पहायला १८७४ मध्ये जमशेदजी टाटा नागपूरला आले. त्यांना पोलादाच्या कारखान्यासाठी कच्चा माल (iron ore) शोधायचा होता. एक नमुना त्यांना मिळाला, जबलपूरजवळची एक संपूर्ण टेकडीच त्या खनिजाची होती. पण ते तिथे गेले असता त्या टेकडीवर असलेल्या बाबाच्या अनुयायांनी प्रतिकार केला. त्यानंतर इंग्रजांनीसुद्धा मनाई केली; (सध्याच्या सरकारपेक्षा ते अधिक मानवतावादी होते असे म्हणायचे का?). जमशेदजींना मग वेगळी युक्ती सुचली.

नागपूरच्या रेल्वेस्थानकाच्या बाजूला त्यांनी कापसाचे ढिगारे पाहिले होते (काॅटन मार्केट) तिथेच बाजूला जुम्मा तलाव होता आणि मोकळी जमीनही होती. नेटिव्ह आणि इंग्रज, दोघेही एकमेकांच्या भीतीने तिथे वस्ती करत नव्हते. इथे कापडगिरणी उभारली तर फायदेशीर ठरेल हे जमशेदजींच्या लक्षात आले. त्यांनी पोलाद कारखान्याचे स्वप्न बाजूला ठेवून इंग्रजांना अर्धा जुम्मा तलाव आणि बाजूची जमीन कापड गिरणीसाठी मागितली. तलाव अर्धा करण्यासाठी बांध घातला (रमण सायन्स सेंटर समोरचा रस्ता). १ जानेवारी १८७७, म्हणजे ज्या दिवशी क्वीन विक्टोरिया भारताची एम्प्रेस्स झाली त्याच मुहूर्तावर एम्प्रेस्स मिलचेही उद्घाटन झाले. उद्योगाकरिता निसर्गाचा नाश आणि झोपडपट्टीची निर्मिती (बजेरिया) हे पायंडे तेव्हापासून पडले. पुढे मिल बंद करण्याची जबाबदारी टाटांनी सरकारी महामंडळाकडे सोपवली, ज्यांनी २००६ च्या सुमारास मुंबईच्या विकासकामार्फत मिलमधील तलाव पूर्णपणे संपवला. तो टिकावा म्हणून कोर्टांत अर्ज केले, पण काही उपयोग झाला नाही.

जुम्मा तलावाची मागणी करण्याआधी टाटांनी नगरनाईक काळे सावकार यांच्याकडे नाईक तलावाची मागणी केली होती, पण हे नामुष्कीचे ठरेल असे वाटून काळ्यांनी नकार दिला. नाईक तलाव लेंडी तलावाच्या खालच्या अंगाला बांधून काढला होता. भूजलपातळी उंच असल्याने लेंडी तलाव नैसर्गिकरित्याच अस्तित्वात होता, पण उथळ होता. तो दुर्लक्षित असल्यामुळे त्यात एक-एक झोपडीची भर पडत गरीब लोकांच्या वस्तीने तो व्यापला गेला. शहरांमध्ये स्थलांतरित गरिबांकरिता अधिकृत जमिनीची कुठलीच सोय करायची नाही आणि त्यांनी निसर्गावर केलेल्या अशा अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करायचे अशा प्रशासकीय धोरणामुळे तलाव संपला.

पांढराबोडी तलावाचा बांध ना.सु.प्र. आणि उज्ज्वल सोसायटीने मिळून फोडला. कोर्टाने हेही थांबवण्यास नकार दिला. तलावाच्या सत्तावीसपैकी वीस एकरांवर बाजीप्रभूंच्या नावाने नगर वसवले गेले. उरलेल्या सात एकरांत टी.चंद्रशेखरने आयआरडीपी रस्त्यांच्या मलब्याचे उंच ढीग लावले आणि मनुकुमारने तो मलबा पसरवून त्यावर टेनिस कोर्टाचे उद्घाटन केले. सोनेगाव तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ना.सु.प्र.च्या विश्वस्त मंत्रीमहोदयांनी लेआऊट आखला. नंतर तेथील लोकांच्या घरात पाणी जाऊ नये म्हणून म.न.पा.ने तलावातील पाणी काढून टाकण्याची व्यवस्था केली, नंतर सगळ्या बाजूंनी भिंत उभारून पाणलोट क्षेत्राची तलावापासून फारकत केली. असेच पारडी (बारादरी) च्या बाबतीत घडते आहे, ज्यामुळे तलावाजवळ जायला लोकांना सक्त मनाई आहे. सक्करदरा बागेत भोसले लेआऊट केल्यावर ना.सु.प्र.ने सक्करदरा तलावाच्या अर्ध्या भागात भरण टाकून काँक्रिटची बाग केली.

अंबाझरीच्या सांडव्यावर अवैधरित्या उभारलेला, पण नंतर वैध ठरवलेला विवेकानंदांचा पुतळा नागपूरची नवी वैधानिक ओळख सांगत उभा आहे. त्यापुढील नागनदीवरची शासकीय अतिक्रमणे लोकांचा खूपच क्षोभ झाला तेव्हा काढली. अंबाझरी व फुटाळा तलाव, तेलंगखेडी, बॉटेनिकल गार्डन ह्या बागा अजूनही रमणीय आहेत; त्यामुळे त्यांच्या खाजगीकरणाचा काही मंडळींनी चंग बांधला आहे. लोकांना या बागांमध्ये जाण्यासाठी अंशतः किंवा पूर्णतः बंदी आहे (मोठ्यांचे लग्नसमारंभ हा अपवाद). तर, उत्तर नागपुरात मोकळ्या जागा हडपण्याचा उद्योग ‘गुंठेवारी कायद्यांतर्गत’ सुरू आहे.

‘हमको होना’ वाल्या टोळीला ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे हवे ते मिळाले. ना.सु.प्र.ला बढती मिळून एनएमआरडीएच्या अवतारात निसर्गमुक्ती कार्यक्रम राबवण्यासाठी मेट्रो-रिजनचे ३५०० चौ.किमी. अधिकारक्षेत्र मिळाले. नागरिकांना कुलूपबंद बागा आणि संकोचलेले बंदिस्त तलाव मिळाले.

सरकार विरोधात नि:शब्द निसर्गाच्यावतीने मोजक्या नागरिकांनी लढायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांची शक्ती कमी पडली. सत्ता, पैसा आणि ‘कायदेशीर’ अभय हे पाठबळ त्यांच्याकडे नव्हते. विकृत प्रवृत्ती मात्र या सर्वांच्या आधारे बेगुमान होत्या. निसर्ग हे शहराचे बलस्थान असते; तर धाक दाखवून विनाश करण्याची विकृती हे लुटारूंचे बलस्थान असते! सत्ताधारी विकृतपणे वागतात कारण लोकशाहीकरिता अपेक्षित, सर्वांच्या भल्यामध्ये त्यांचे स्वतःचेही भले आहे हे समजेल, अशी बुद्धी त्यांच्याकडे नाही; सगळ्यांना मिळाले तर आपले महत्त्व कमी होईल अशीच जुनाट मानसिकता आहे. ‘सामान्य’ नागरिकांनी एकत्रित येऊन या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केला नाही तर अशा व्यवस्थेकडे जोपर्यंत नियंत्रण आहे तोपर्यंत शहर आणि पर्यायाने देशही विनाशाकडे जात राहण्याचीच शक्यता अधिक! (क्रमशः)