• सोनाली कोलारकर-सोनार (sonalikolarkarsonar@gmail.com)

नागपूरच्या मिस्टर अँड मिसेस पर्यावरण यांना पाहुण्यांची सरबराई करायला फार आवडतं. पक्के नागपूरकर आहेत ते ! आम्हाला आरामात बसायला तर त्यांनी सांगितलंच पण ‘फिक्र’ला देखील अगत्याने बसवलं. तिच्याशी बातचीत करण्यापूर्वी ते आम्हाला म्हणाले, “कुठून आलात तुम्ही आत्ता? अमरावती रोड हून शिरलात का?” म्हटलं, “हो, तिथूनच आलो. छान झाला आहे सगळा परिसर! भला मोठा फ्लाय ओव्हर, त्याखाली अप्रतिम हिरवेगार दुभाजक. त्यात अभिमानाने ऊर भरून येईल असे परमवीर चक्र मिळवलेल्या कुटुंबीयांची माहिती लावलेले फलक, काही अंतरावर असलेला विद्यापीठाचा, एलआयटी टेकडीचा हिरवा परिसर, थोडं समोर गेल्यावर भरतनगरचं वन! इथला सगळाच परिसर तलाव आणि वृक्षराजीने बहरला आहे.”

मिस्टर पर्यावरण मनमोकळं हसत म्हणाले, “हो, सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, फुटाळा तलाव सगळीचकडे, झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. पार अठराव्या शतकात घनदाट जंगलातील या टेकडीवर कॅथॉलिक चर्चद्वारे सेमिनरी उभारली गेली. आणि मग सेमिनरी हिल्स हे नाव सगळीकडे झालं. इथल्या प्रचंड वनसंपत्तीची काळजी वनविभाग, महापालिका आणि माझी जनता यांनी घेतली.

सेमिनरी हिल्सवर काय नाही? चाळीस हून जास्त प्रजातीचे वृक्ष या जंगलात आहेत. भरपूर औषधी वनस्पती आहेत. अनेकांनी आपल्या अभ्यासातून नोंद करून ठेवलेली प्रमुख झाडे म्हणजे अशोक, जंगली बदाम, मोहीन, आंबा, साल, साग, आपटा, सिसम, कांचन, कासोद, गुलमोहर, पळस, डिकेमाली, कडुलिंब, बकुळ, काटेसावरी, करंजी, पेरू, बोर, लिंबू आणि खूप काही! भरत वनात देखील भरपूर विविध प्रकारची झाडं आहेत. फुटाळाजवळच सातपुडा बोटॅनिकल उद्यान आहे. ते तर खास संवर्धनासाठीच उभारलं गेलं आहे. तेलंगखेडीचे उद्यान राजे भोसल्यानी उभारले तेव्हा वन विहार हाच काही उद्देश नव्हता तर पर्यावरणाची जोपासना हा मूळ उद्देश होता. सेमिनरीला ‘नागपूरचे फुफ्फुस’ म्हणतात ते उगीच नाही!”

पावसाळी हवेत या सगळ्या वनसंपत्तीला बघायला आम्ही जेव्हा फेरफटका मारला तेव्हा ओल्या मातीचा, हिरव्या तरतरीत पानांचा सुगंध नागपूरला प्रफुल्लित करत होता. “गांधीसागरजवळचा बगिचा, लता मंगेशकर उद्यान – जिथे शहरातील पहिले ॲडव्हेंचर उद्यान उभे करण्याचा मानस आहे आणि पूर्व नागपुरातील लहाऩमोठे बगिचे, असं बघितलं की वाटतं नागपूरमध्ये बागांची कमी नाहीच!”, मिसेस पर्यावरण म्हणाल्या. शिवाजीनगर, त्रिमूर्तीनगर, शंकरनगर, सोनेगाव सारखे स्वच्छ, सुंदर बगिचे बघितले की वेगळाच दिलासा मिळतो.

बगिच्यांमध्ये पानगळ होते तेव्हा आधीच्या काळात हा कचरा जाळण्यात यायचा आता बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत बगिचा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला मदत करायला सुरुवात केली. लीना बुधे आणि तिच्या पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेने त्रिमूर्तीनगर, सुयोगनगर इथल्या बगिच्यासाठी बागेतच कंपोस्ट तयार करण्याचा प्रकल्प राबवला. नागपुरातील सोमलवार, पितळेशास्त्री सारख्या काही शाळा आणि काही स्वतंत्र घरांनी देखील पुढाकार घेत कंपोस्ट तयार केलं. लीनाच्या या प्रयोगात दोन हजार किलोहून अधिक कचऱ्याला हाताळण्यात आलं. भरपूर खतनिर्मिती झाली. हा प्रयोग यशस्वी झाला.

डॉ. स्मिता भाबरा या महापालिकेसोबत आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करून उत्तम उपाय सुचवणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञ, बगिचा आणि मोकळे पटांगण असण्याबाबत कायम आग्रही असतात. मिस्टर पर्यावरण यांनी वाफाळत्या चहाच्या घोटासोबत एक मौलिक गोष्ट सांगितली, डॉ. स्मिता भाबरा नेहमी म्हणतात की, शहरीकरण करताना आजकाल तुम्हाला गुदमरल्यासारखं का वाटतं? तर आजकाल हाय राईज बिल्डिंग होताना तुमच्या नगरवजा दिवाणखान्यात पूर्वी जसं एक बगिचा आणि एक पटांगण कायम असायचं तेच आता कुठे दिसत नाही. फार अभावानेच असतं ते. या गोष्टी असणे फार गरजेचे आहे कारण तरच प्रदूषण नामक अनाहूत पाहुणा तुमच्या घरात यायला बिचकेल!

“एकेकाळी शंभरहून जास्त बागा होत्या नागपूरच्या घराला! आता सुद्धा तितक्याच असतील, पण काहींची अवस्था बाग म्हणण्यासारखी नाही तर काही आता कागदोपत्रीच शिल्लक असतील.” फिक्रकडे बघत तिच्या मनातील भावना ओळखत मिस्टर पर्यावरण म्हणाले. फिक्रने मान डोलावली. अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर तिचा जीव घाबरायचा बऱ्यापैकी थांबला होता.

मिसेस पर्यावरण यांना तर गप्पांच्या ओघात खूप जुन्या गोष्टी आठवल्या. रघुजीराजे भोसले आणि त्यांच्या वारसांमुळे ‘तलाव आणि बगिच्यांचे शहर’ म्हणून नागपूरला ओळख मिळाली. संत्रानगरी म्हणून या शहराला ओळख मिळाली ती रघुजी राजांनी दुसऱ्या प्रांतातून संत्र्याची रोपे आणून लावली आणि जगवली. असं म्हणतात की, बिंबाजी भोसले यांनी अंबाझरी तलावाला अधिक उत्तम स्वरूप दिलं म्हणून त्याला बिंबाझरी असं देखील म्हणायचे. आंब्याच्या झाडांनी आजूबाजूचा प्रदेश व्यापून गेला होता म्हणून मग अंबाझरी नाव दिलं गेलं! अशी देखील आख्यायिका आहे की, त्या काळात इथून शहराला पाणीपुरवठा व्हायचा तो खापराच्या पाईप लाईनने! रघुजी राजे आणि शाही परिवार नाग नदीच्या सीताबर्डीजवळच्या संगमावर हत्ती घोडे घेऊन यायचे तेव्हा हत्ती पाण्यात डुंबायचे.

फुटाळा, अंबाझरी इथल्या बागा अगदी आत्ता आतापर्यंत घनगर्द होत्या की इथे रात्री बेरात्री फिरताना भीती वाटायची. उन्हाळ्यात थंडगार अंगणात गाद्या घालून झोपता येण्याच्या, ९०-९६6 सालापर्यंतच्या काळात “फुटाळ्याच्या बगिच्यात टकलू भूत येतं आणि झाडं किंवा फुले तोडली असतील तर ते भूत आपल्याला कंगवा मागत!” अशा लोटपोट हसवणाऱ्या भुताच्या गोष्टी देखील बागांच्या संवर्धनाच्याच असायच्या!

फिक्र आता बोलती झाली आणि म्हणाली, “कुठे गेले ते वैभव मग आता? सगळीकडेच नाहीत नं आता हिरवेगार रस्ते? काही भागातच आहेत! किती बागा खरंच स्वच्छ असतात? रस्त्याने जाताना झाडांची झालेली कत्तल आणि प्रचंड बांधकामामुळे वाढत्या

प्रदूषणात झाडांच्या भोवती घट्ट सिमेंटचे वेढे त्यांना कमकुवत करणारे! बोटॅनिकल गार्डनची देखभाल यथातथाच, जपानी गार्डन तर पारच उजाड झाला आणि अंबाझरी तर आता पूर्ण बंदच आहे. पण तिथे निदान कामाला सुरुवात झाली आहे! अशी मोठी यादी आहे.” मिस्टर पर्यावरण दूरवर बघत म्हणाले, “हो, आता माझ्या घरात कभी खुशी, कभी गम अशी स्थिती आहे!”

फिक्र कधी नव्हे ते मिश्कीलपणे म्हणाली, “सध्यातरी मला प्रत्येक बागेत पुणेरी पाट्या असतात तशी एक खास नागपुरी पाटी लावण्याची इच्छा झाली आहे. “बागेत कोणत्याही प्रकारचा कचरा केल्यास आणि बागेची नियमानुसार संबंधित कार्यालयांनी देखभाल न केल्यास ‘टेणपण्यात’ येईल!”