– सोनाली कोलारकर-सोनार
नागपूरची गोष्टच वेगळी! राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची कित्येक महत्त्वाची कार्यालये नागपूरला आहेत. प्रदूषण नियामक मंडळ, मृदा सर्वेक्षण, जलसंपदापासून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांपर्यंत अनेक महत्त्वाची कार्यालये नागपूरला काम करताहेत. नीरी तर आहेच. संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांच्या संशोधनासाठी देखील काम सुरू आहे.
नागपूरला पन्नासहून जास्त पर्यावरणावर काम करणाऱ्या खाजगी प्रयोगशाळा आहेत जिथे घरगुती आणि औद्योगिक अशा सगळ्या ठिकाणचे पाणी, इतर प्रदूषण निगडित बाबी तपासल्या जातात. नागनदीसकट इतरही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानचे सहकार्य देखील घेण्यात आले. स्मार्ट डस्टबिनचा प्रयोग करण्यात आला. या स्मार्ट डस्टबिनच्या सेन्सर्समुळे डब्याच्या बाहेर कचरा ओसंडून वाहण्याचा प्रकार बंद होण्याची अपेक्षा असते. डबा क्षमतेइतका भरला की लगेच कचरा संकलन विभागाला त्याचा निरोप जातो आणि कचरा उचलला जातो. कचरा गाड्यांना क्यूआर कोड देण्यात आले आणि त्यांनी कचरा संकलन केले की नाही याची नोंद ठेवण्याचा प्रयत्न झाला. शहरवासीयांना तक्रार नोंदवता यावी म्हणून आधुनिक ॲप तयार करण्याचा प्रयत्न देखील झाला. असं खूप काही झालं, होत असत, आणि सगळ्यावेळी भाकरी का करपलीचं उत्तर मिळतं योग् वेळी न फिरवल्याने! कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी सुयोग्य होणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य असणे हेच सगळ्यात आवश्यक असते.
अनेक उत्तम महत्त्वाची कार्यालये नागपुरात असताना त्यांचा शहराचे पर्यावरण सुदृढ ठेवायला सुयोग्य वापर किती केला गेला हा मुळात प्रश्न आहे. पर्यावरण लॅबमध्ये काम करताना आणि इथे काम करणाऱ्या इतरही अनेकांशी चर्चा केल्यावर एक महत्त्वाची बाब त्यांनी लक्षात आणून दिली की नागपूरला चांगले ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी’ (एमआरएफ) नाहीय आणि त्यामुळे कचरा पुनर्वलन करण्यात मोठी अडचण निर्माण होते. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा देणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू आहे. भारतातील नागपूर हे असे पहिले शहर आहे जिथे हा प्रयोग झाला. कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या योजनेची देखील चाचपणी सुरू झाली. ‘वीज वाचवा’ आणि ‘प्रकाश प्रदूषण कमी करा’च्या प्रयोगात पौर्णिमेला एक तास दिवे बंदच्या नागपूरच्या प्रयोगांची देशभर चर्चा झाली आणि वाहवा देखील झाली. असं खूप काही सुरू असतेच! आणि अशावेळी शहराच्या सुदृढ पर्यावरणासाठी ‘अर्बन स्प्रॉल’ला आवर घालणे देखील गरजेचे असते. शहराबाहेर अस्ताव्यस्त वाढलेले शहराचे हातपाय हे मूळ शहराला धोकादायक ठरते.
सध्या शहरात फुटपाथ स्वच्छता मोहीम सुरू आहे. बालकमंदिरातील लहान मुलांना कसं एकदा रांगेत उभं करून बाई बाहेर गेल्या की सगळी मुलं पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतात किंवा मज्जा करायला लागतात, तसच काहीसं या मोहिमेचं झालं आहे. शिक्षक आले की सगळा स्वच्छ, मोकळा परिसर, पाठ फिरली की जैसे थे! आणि आपण कुटुंबीय तर महानच आहोत. आपणच म्हणत असतो रस्त्याने चालायला जागा नाही, ठेल्यावर स्वच्छ खायला मिळतं का, त्याची तपासणी व्हायला हवी! आणि ठेले लागले रे लागले की आधी तिथे रांगा लावतो.
‘हम ऐसें क्यू है?’
“पर्यावरण स्थिती अहवाल” वाचतना मोठी गंमत वाटत राहते. पाणी वाया जातं, कारण ‘पाईप लाईन लिकेज’ पेक्षा नळ बंद न करणे जास्त कारणीभूत आहे. हवा प्रदूषण होत आहे कारण लोकं सरळ जाळतात कचरा! घरातील नको असणारे कपडे कुठल्या पुनर्नविकरण सेंटरला देण्यापेक्षा जाळून टाकणारे लोकं देखील कमी नाहीत. ‘पर्यावरण स्थिती अहवालात’ नमूद केल्यानुसार अनावश्यक हॉर्न, नद्यांमध्ये कचरा नेऊन टाकणे आणि पाण्याचे प्रदूषण वाढवायला आपल्या वागण्याने सर्वतोपरी मदत करणे यांचा विशेष उल्लेख आहे. औद्योगिक किंवा प्रकल्पांच्या बांधकामामुळे, होणाऱ्या प्रदूषणापेक्षा घरांच्या बांधकामाच्यावेळी नियम न पाळल्यामुळे शहरात जास्त प्रदूषण वाढल्याची देखील नोंद आहे. नागनदीचे उगमस्थान, दाभ्याजवळचे ‘लावा’ देखील प्रदूषणमुक्त नाही. पोहरा नदीचे उगमस्थान कोणते यावर मतभेद आहेत. म्हणजे कदाचित प्रदूषणामुळे ते देखील झाकोळले गेले असणार.
नागरिक नियम पाळत नाहीत, अधिकारी लक्ष देत नाहीत, मग हव्या त्या उपाययोजना होत नाहीत म्हणून नागरिक नियम पाळत नाहीत! असं चक्र सुरू राहतं. ही कोंडी फोडायची असेल तर आपण पर्यावरण साक्षर होण्याची गरज आहे. ‘पदवी अभ्यासक्रमात दोन क्रेडिट्सचा कोर्स आहे आम्हाला, काहीच करायचं नसतं, नोट्स दिलेल्या असतात त्या बघून वही लिहायची, एक परीक्षा कुठे होते कुठे नाही!’ असं चित्र बदलायचं असेल तर फक्त साक्षर नाही तर ‘सु’शिक्षित होण्याची गरज आहे. पाण्याच्या एटीमपासून स्मार्ट डस्टबिनपर्यंत सगळं आता तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिल आहे. आपण सगळ्या बाबतीत टेक्नोसॅव्ही होण्याकडे वेगाने जातो आहोत तर आधी आपलं आरोग्य टेक्नोलॉजीची मदत घेत मस्त करायला काहीच हरकत नाही. जनता आणि सरकारी, खाजगी यंत्रणा एकमेकांना सहकार्य करतील तेव्हाच ही कोंडी फुटू शकेल! नव्या पिढीशी बोलताना त्यांनी एक गोष्ट खूप छान सांगितली. “आम्ही कोणत्याही प्रांतात गेलो की आधी तिथल्या आकाशाचे फोटो एकमेकांना पाठवतो! ते जितके निळे, स्वच्छ तितका तो प्रांत आम्हाला आवडतो. आम्हाला भौतिक सुखं हवी आहेतच, परंतु ती इतकी देखील नकोत की आम्हाला निळे आभाळच दिसणार नाही.”
‘शहरबात’मध्ये फिक्र आणि श्रीयुत पर्यावरण यांनी एकच गोष्ट आवर्जून सांगायला म्हटलं आहे ‘तुम्ही शहरासाठी काहीच करू नका” म्हणजे काय? तर, “तुम्ही एकही झाड लावू नका; ती आपोआप उगवतात, तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका; ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते, तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका; सर्वत्र शांतताच आहे, तुम्ही फक्त नको तो आवाज करू नका. तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही ती क्षमता निर्सगात आहे. फक्त तुम्ही जंगले नाहीशी करू नका. तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका; सर्व व्यवस्थितच आहे, फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा!!”
‘शहरबात’ला गेला महिनाभर वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. नागपूरवर जिवापाड प्रेम असणाऱ्या सगळ्या वाचकांना, माझ्या पर्यावरणतज्ज्ञ सहकाऱ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
sonalikolarkarsonar@gmail.com
