नागपूर : देशाच्या काही भागात यावर्षी उष्णतेच्या लाटांमुळे सर्वाचेच जगणे कठीण झाले आहे. काँक्रिटीकरणामुळे कडक उन्हाळय़ाचा सर्वाधिक फटका शहरी भागाला बसत आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या पाच दशकात नागपूर शहराने मे महिन्यात सर्वाधिक १०७ दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याने त्यांच्या संकेतस्थळावर १९६९ ते २०१९दरम्यान उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार, नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे, ज्या शहराने मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे १०० दिवस ओलांडले आहेत. ९० दिवस उष्णतेच्या लाटेसह चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आणि ८० दिवसांसह यवतमाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे सायंकाळी थंड होणारी शहरे आता थंड होत नाहीत. तापमानाच्या उच्चांकामुळे नैसर्गिकरित्या शहर थंड करणारी यंत्रणा कूचकामी ठरली आहे. एखाद्या ठिकाणचे तापमान मैदानी भागात ४० अंश सेल्सिअस आणि किनारी भागात ३७ अंश सेल्सिअस व टेकडय़ांमध्ये ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते, तेव्हा उष्णतेची लाट येते. हवामान खाते उष्णतेची लाट घोषित करते तेव्हा त्या ठिकाणी तापमान त्या दिवशीच्या सामान्य तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक असते. यावर्षी मार्च महिन्यापासूनच देशात उष्णतेच्या लाटांची सुरुवात झाली. नागपूर शहराने गेल्या अनेक दशकातील सर्वात उष्ण एप्रिल महिना अनुभवला आणि मे महिन्यात देखील ही उष्णता कायम आहे. मार्च महिन्यात पश्चिम राजस्थानमध्ये अँटीसायक्लोन आणि पाऊस-वाहणाऱ्या वेस्टर्न डिस्र्टबन्सच्या अनुपस्थितीमुळे देशात उष्णतेच्या लाटेचा हंगाम सुरू झाला होता. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात नागपुरात आतापर्यंत तीन दिवस उष्णतेची लाट आली आणि सलग आठ दिवस कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.

यावर्षीच्या उन्हाळय़ात अकोला, ब्रम्हपुरी आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या लाटेसह सर्वाधिक उष्ण दिवसांची नोंद झाली आहे. ब्रम्हपूरी येथे मे महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक आठ दिवस ४४ अंश सेल्सिअस तर अकोला, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी सात दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले आहे.

अवकाळी पावसाने उकाडय़ात वाढ

यावर्षीच्या उन्हाळय़ाने तापमानाचे सर्व विक्रम तोडत उच्चांक गाठला आहे. उष्णतेच्या लाटा देखील विक्रम नोंदवत आहेत. एकीकडे तीव्र तापमान तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आहे. मात्र, या हलक्या पावसामुळे उकाडय़ात आणखी वाढ झाली आहे. नागपूरसह चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकोला, वर्धा, अमरावती या शहरांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.