नागपूर: रविवारी सकाळी नागपूर जिल्हा स्फोटाने हादरलाय. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारूद कंपनीत आज पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट झालाय. ज्यामध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १८ कामगार जखमी आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झालाय तेथील सर्व वस्तू आणि इमारतीचा मलबा पाचशे ते सातशे मीटर दूरपर्यंत फेकला गेलाय. मृतकांमध्ये बहुतांश महिलांचाच समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीसुद्धा प्रशासनाकडून स्फोटाची माहिती जाणून घेतल्यानंतर तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत. यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून हा परिसर सील करण्यात आला आहे. कुणालाही तिथे जाण्याची परवानगी नाही. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटानंतर त्या ठिकाणी भीषण आग लागली होती, सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग सुद्धा आटोक्यात आली आहे आणि, त्यामुळे बचाव कार्यालाही वेग आलेला आहे. कळमेश्वर पोलिसांच्या ठाण्याअंतर्गत राहुळगाव या ठिकाणी ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ ही बारूद कंपनी आहे. ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे.
खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. रविवारी सकाळी झालेल्या या अपघाताने अनेक दूर अंतरापर्यंत हादरे पोहोचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
“नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
