नागपूर : जिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये गेल्या अडीच वर्षांत झालेल्या पाच स्फोटांच्या घटनांमध्ये एकूण ४१ कामगारांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तब्बल ७५ टक्के म्हणजे ३१ महिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनांमध्ये ३८ कामगार गंभीर जखमी झाले असून अनेकांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त झाले आहे. या घटना घडूनही सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या स्फोटक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची मोठी संख्या असून पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो) या संस्थेकडून त्यांना परवाने दिले जातात. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या स्फोटक उत्पादनाचे ४८ परवाना धारक युनिट कार्यरत आहेत. यापैकी सर्वाधिक १७ युनिटचे परवाने सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीकडे आहेत. इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या कंपनीकडेही नऊ युनिटचे परवाने आहेत. या दोन्ही कंपन्या सोलर ग्रुपच्या अंतर्गत येतात.

जिल्ह्यातील बहुतांश स्फोटक कंपन्या काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात कार्यरत आहेत. या भागात शेतीशिवाय अन्य रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे स्थानिक कामगार ठेकेदारी पद्धतीने या धोकादायक उद्योगांमध्ये काम करतात. अनेक कामगार अल्पशिक्षित असून कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या सूचना प्रामुख्याने इंग्रजी भाषेत असल्यामुळे त्यांचे पालन करणे कठीण जाते. तरीही रोजंदारीच्या २५० ते ३०० रुपयांसाठी हे कामगार जीव धोक्यात घालून काम करतात.

पाच मोठे स्फोट

नागपूर जिल्ह्यातील स्फोटक कंपन्यांमध्ये डिसेंबर २०२३ पासून आतापर्यंत पाच मोठे स्फोट झाले. १७ डिसेंबर २०२३ रोजी चाकडोह येथील सोलर इंडस्ट्रीज कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर १३ जून २०२४ रोजी धामना लिंगा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये स्फोट होऊन नऊ जणांचा बळी गेला.

१६ फेब्रुवारी २०२५ रोजी एशियन फायरवर्क कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगार मृत्युमुखी पडले. ४ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा सोलर इंडस्ट्रीजमध्ये स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर १ मार्च २०२६ रोजी एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १६ महिलांचा समावेश आहे.

या दुर्घटनांनंतर पेसो आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली असली तरी बहुतेक अहवाल अद्याप सार्वजनिक झालेले नाहीत. काही प्राथमिक निष्कर्षांनुसार सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे, अपुरे प्रशिक्षण आणि स्फोटक पदार्थांची अयोग्य हाताळणी ही दुर्घटनांची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या उद्योगांमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागपूर जिल्हा ‘स्फोटांची राजधानी’ होणार का?

नागपूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये ४७ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याची बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्याची ओळख ‘स्फोटांची राजधानी’ म्हणून होण्याची भीती असल्याचा आक्रमक सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.