नागपूर: नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदतही जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून एक्स माध्यमावर ही माहिती दिली गेली. महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधार व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन प्रभावित नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. तसेच जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील, असे मोदी यांनी सांगितले.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर करत म्हटले होते की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राऊळगावजवळील येनवरा येथे एसबीएल एनर्जीचे युनिट आहे. तेथे विविध डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्स्प्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी ३० हून अधिक कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. काही कामगार मलब्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यात नेमकी किती प्राणहानी झाली याचा आकडा समोर आलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक कामगार मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे.
