नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे एस. बी. एल. दारूगोळा कंपनीत रविवारी जो भीषण स्फोट झाला त्यात एकूण १९ जण दगावले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेच्या वेळी १८ जणांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. हा स्फोट इतका भीषण होता, की नंतर लागलेल्या आगीत परिसरात विखुरलेल्या अवयवांचा कोळसा झाला होता. विभागीय न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेच्या चमुने यातला एकेक नमुना गोळा करत या सर्व अवयवांचे युद्धपातळीवर विश्लेषण केले.

न्यायवैद्यकच्या टीमने मृतांच्या नातेवाईकांशी त्यांचा डिएनए जुळवत अचूक ओळख पटवली. त्यानंतर मेडिकलच्या टीमनेही सलग २४ तास सेवा देत सर्व १८ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण केले. विभागीय न्याय वैद्यकशास्त्राची टीम आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन विभागाने आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर शिघ्र प्रतिसाद दिल्याने हे शक्य होऊ शकले.

पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील १८ मृतदेहांचे अवशेष…

स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने १८ जणांचे पूर्णपणे होरपळलेले मृतदेह मेडिकलच्या न्यायवैद्यक विभागात पाठवले. एकूण ५ पिशव्यांमध्ये हे तुकडे आणि जळालेल्या मानवी अवशेषांचा समावेश होता. अवशेषांची स्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. न्यायवैद्यक विभागाचे उपसंचालक डॉ. अश्विन गेडाम यांच्या पथकाने बारकाईने या अवयवांचे विश्लेषण केले. विभागाकडून डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

न्यायवैद्यक पथकाच्या प्रयत्नांमुळे मृतांची ओळख पटवणे शक्य

विभागप्रमुख डॉ. अनिंद्य मुखर्जी, प्रोफेसर डॉ. शैलेंद्र धवने, संकलन समन्वयक वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. नितीन जे. एल., डॉ. बालनागेंद्रन जे, फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २ मार्चला सायंकाळनंतर विभागीय न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास सुरुवात झाली. वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. हृषिकेश पाठक, सहयोगी प्राध्यापक, डॉ. कार्तडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दुधे, आणि डॉ. अभिषेक पिल्लई, डॉ. जयराज आर., डॉ. शीतल दामोदरे, डॉ. शुभम सिंग, डॉ. ध्रुव पटेल, डॉ. तन्मय कांते, डॉ. वाहिद आणि डॉ. संकेत काकडे, डॉ. ऋषिकेश मोरे, डॉ. उदय, डॉ. कविन कुमार, डॉ. अरमान आणि डॉ. काझी यांनी सलग २४ तास युद्धपातळीवर मृतांचे शवविच्छेदन केले. विभागीय न्यायवैद्यक टीमने नातेवाईकांच्या डिएनए नमुन्यांचे युद्धपातळीवर विश्लेषण केलेल्याने अनोळखी मृतदेहांची ओळख पटवणे शक्य झाले. कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.