नागपूर : देशाची राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात सोमवारी भीषण स्फोट झाला. तिथून अगदी १०० मिटर अंतरावर मी दुकानासमोर उभा होतो. क्षणभर काही कळालेच नाही. डोळ्यांसमोर दिसत होता तो आगडोंब, आक्रोश आणि सैरावैरा धावणारे लोक. स्वतःला सावरत जेव्हा मी दुकानाकडे धावलो तेव्हा अवतीभवती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शरीराचे तुकडे विखुरले होते. हे दृष्य डोळ्यांसमोरून जात नाही आणि रात्री झोपही येत नाही.

पायाखालची जमीन हादरवत अंगावर शहारे आणणारी ही आपबिती मांडली आहे, धीरज वानखेडे यांनी. धीरज हे नवी दिल्लीत झालेल्या स्फोटाची घटना पाहिलेल्या शेकडो प्रत्यक्षदर्शीपैकी एक. मूळचे नागपूरकर असलेले धीरज वानखेडे यांचे लाल किल्ला परिसरात बाहुल्यांचे दुकान आहे. जिथे सोमवारी बॉम्बस्फोट झाला, तेथून अगदी काही पावलांवर धीरज आपल्याच दुकानासमोर उभे होते.

मूळचे नागपूरचे असलेले धीरज वानखेडे या स्फोटाची भीषणता कथन करताना सांगत होते, लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरूद्ध बाजूला बरीच दुकाने आहेत. पर्यटक इथे खरेदीसाठी येतात. तिथेच माझेही दुकान आहे. सोमवारी सायंकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी अवघ्या १०० मीटर दूर होतो. अचानक मोठा आवाज आला आणि आगीचा भडका उडाला. काही तरी मोठे झाल्याची जाणीव झाली. आम्ही सगळे दुकान सोडून पळत सुटलो. पुढच्या काही मिनिटात परिसराला पोलिसांनी वेढा घातला.

कटू आठवणी मनावर कोरल्या…

स्फोटानंतर पाहिलेले चित्र इतके भयंकर आणि हृदयद्रावक होते, की ती कटू आठवण मनावर कोरली गेली आहे. काही केल्या तो प्रसंग पुसला जात नाही. सुरुवातीला एका गाडीमध्ये सीएनजी किटचा स्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. सिलेंडरचा स्फोट झाल्याचे कोणी म्हणत होते.

वास्तविक स्फोट किती भीषण होता हे नंतर कळाले. आम्ही लांब पळालो म्हणून वाचलो. जर सुरुवातीलाच स्फोटाची भीषणता कळाली असती तर चेंगराचेंगरी झाली असती. इतकी गर्दी त्यावेळी बाजार परिसरात होती.

गाव गाठावे की इथेच राहावे…

बाजारातच ही घटना घडल्याने अनेक दुकानदारांना व्यापार सोडून गाव गाठावे असे वाटत आहे. सोमवारच्या घटनेनंतर आम्ही रात्रभर झोपू शकलेलो नाहीत. मात्र कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याने मन धजावत नाही. माझ्यासह इथल्या प्रत्येकाला शेकडो फोन येत आहेत. दिल्लीत आल्यापासून पहिल्यांदाच मला एका दिवशी इतके फोन आले. जीव वाचवून नागपूर गाठावे, की दुकान पुन्हा सुरू करावे, अशा द्विधा मनःस्थितीत आम्ही आहोत.

घटना घडल्यापासून दुकाने पूर्णतः बंद आहेत. या परिसरातील दुकानदार दूर उभे राहून पहात आहेत. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. दुकान बंद असले तरी ज्या दुकानावर पोट आहे, त्याच्या बाहेर ते उभे आहेत.