नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे गरिब व अल्पशिक्षित शेतकऱ्यांच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडियामधून ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कृषी कर्ज लाटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सुत्रधारासह तिघांना ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातील बंगळुरू आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली.
डॉ. मदन गोपाल मल्लिकार्जुन पाटील (२६), प्रियरंजन अशोक कुमार चौधरी उर्फ गौरव मिश्रा उर्फ गौरव जयस्वाल (४२) आणि राहुल उर्फ संदीप सतीश दुबे (३७) अशी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टॅट बँकेला ७३ कोटींनी गंडवणाऱ्या ठगबाजांची नावे आहेत. प्रियरंजन चौधरी हा या ठगबाजीतला मुख्य सुत्रधार असून त्याच्यावर कर्नाटक राज्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या टोळीत आणखी इतर राज्यातील आरोपींचा समावेश असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.
शेतकऱ्यांच्या सातबारावर उचलले कर्ज…
या टोळीने मौदा आणि रामटेक परिसरातील अल्पशिक्षित शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवले होते. ‘शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून प्रतिवर्ष १० हजार रुपये मोबदला मिळतो, त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागेल’ असे आमिष दाखवून टोळीने शेतकऱ्यांचे आधार , पॅन कार्ड आणि ७/१२ उतारे मिळवले. त्यांना बँकेत नेऊन खाते उघडले.या टोळीने शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर लाखो रुपयांचे कृषी कर्ज उचलले. आरोपींनी एसबीआय बँक मौदा येथून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार आणि रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ७३ कोटी ८२ लाखांहून अधिकचे कर्ज लाटले. ही रक्कम बनावट कंपन्या स्थापन करून त्यात वर्ग करण्यात आली.
बनावट वेअरहाऊस परवाने….
दिल्ली येथून नियोजनबद्ध पद्धतीने या टोळीने केंद्रीय प्राधिकरण वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन अथॉरिटी कडून बनावट परवाने मिळवले. या परवान्यांच्या आधारे बँकेमध्ये बनावट तारण ठेवून ‘प्रोड्यूस मार्केटिंग लोन’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलले.
मौदा, रामटेक तालुक्यात १८ जणांवर गुन्हे
या प्रकरणात मौदा व रामटेक पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात सचिन कारेमोरे याला अटक केली होती. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांच्या पथकाने डॉ. मदन गोपाल पाटील याला बेंगळुरू येथून तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या पथकाने प्रियरंजन चौधरी आणि राहुल दुबेला जबलपूरच्या नक्षत्र नगरमधून अटक केली.
