नागपूर : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा आणि गुंगी आणणाऱ्या गोळ्यांचा खरेदी-विक्रीचा आवश्यक अभिलेख सादर न केल्याचा आरोप करीत अन्न व औषध प्रशासनाने नागपुरातील ‘द बॉम्बे फार्मा’ या घाऊक औषध विक्रेत्या संस्थेचे भागीदार विमल राजकुमार चंदवाणी आणि विक्की राजकुमार चंदवाणी यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, जप्त करण्यात आलेल्या औषधांचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि ती कुठे विकली गेली, याचा तपास सुरू आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गंजीपेठ येथील संदेश औषध बाजारातील ‘द बॉम्बे फार्मा’ या घाऊक औषध विक्रेत्याकडून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉन्ट्राकिट आणि अल्प्राझो ०.५ या अल्प्राझोलामयुक्त औषधाची अनियमित विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

अन्न व औषध प्रशासनाने काय कारवाई केली?

या माहितीच्या आधारे १० जून २०२६ रोजी औषध निरीक्षक अभिषेक चवरडोल यांच्या उपस्थितीत संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कॉन्ट्राकिटचा एक संच आणि अल्प्राझो ०.५ या औषधाचे ३१ पट्टे आढळून आले. या औषधांच्या खरेदी-विक्रीची बिले आणि अन्य आवश्यक अभिलेख उपलब्ध नसल्याने औषधाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित साठ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

त्यानंतर काय घडले?

तपासणीनंतर संबंधित विक्रेत्याला औषधांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली. मात्र, दिलेल्या मुदतीत आवश्यक अभिलेख किंवा समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे २५ जून २०२६ रोजी पंचनामा करून संबंधित औषधसाठा जप्त करण्यात आला.

पोलिसांकडे तक्रार का करण्यात आली?

अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीनुसार, संबंधित औषधांचा खरेदी-विक्रीचा कोणताही अभिलेख उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे ही औषधे नेमकी कुठून खरेदी करण्यात आली आणि त्यांचा पुरवठा आणखी कुठे झाला, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा आणि अल्प्राझोलामयुक्त गोळ्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला?

अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी विमल राजकुमार चंदवाणी आणि विक्की राजकुमार चंदवाणी या दोन्ही भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधितांची भूमिका काय?

या प्रकरणाबाबत विक्की राजकुमार चंदवाणी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, “येथील कामकाज माझे मोठे बंधू सांभाळतात. तेच याबाबत माहिती देतील,” असे सांगून त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. विमल राजकुमार चंदवाणी यांची भूमिका मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत मिळू शकली नाही.

पोलिसांचा पुढील तपास कशावर?

जप्त करण्यात आलेली औषधे नेमकी कुठून खरेदी करण्यात आली, त्यांचा पुरवठा कोणाला करण्यात आला आणि खरेदी-विक्रीच्या अभिलेखांचा अभाव का होता, याचा तपास गणेशपेठ पोलिस करीत आहेत. प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे.