नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या कारवाईचा धडाका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही दिसून आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र कारवायांत नियमबाह्य औषधसाठा जप्त केला. एका ठिकाणी आवश्यक वैधानिक माहिती नसलेल्या इंजेक्शनच्या कुप्या, तर दुसऱ्या कारवाईत अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून साठवून ठेवलेल्या ७ हजार १७४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. या दोन्ही कारवायांत एकूण १ लाख ४६ हजार ३५० रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पहिल्या कारवाईत काय आढळले?

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी नागपूर येथील स्कायलाइन इम्पेक्स या आस्थापनाची तपासणी केली. यावेळी ‘केवळ निर्यातीसाठी’ असा उल्लेख असलेल्या बॅक्टेरिओस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन या औषधाच्या ३० आणि १० मिली क्षमतेच्या एकूण १ हजार ६१८ कुप्या जप्त करण्यात आल्या.

या औषधांमध्ये नेमकी त्रुटी काय होती?

तपासणीत या औषधांवर कायद्यानुसार आवश्यक वैधानिक माहिती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही औषधे प्रथमदर्शनी चुकीच्या माहितीचे अंकन असलेली (मिसब्रँडेड) असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत ७४ हजार ६१० रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत काय जप्त करण्यात आले?

२१ जुलै रोजी कन्हान पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून ट्रामाडॉल घटक असलेल्या ‘पिव्हॉन स्पास प्लस’ या औषधाच्या ७ हजार १७४ कॅप्सूल जप्त केल्या. या औषधसाठ्याची किंमत ७१ हजार ७४० रुपये आहे.

या प्रकरणात पुढील कारवाई काय?

अंमली पदार्थ व मनःप्रभावी औषधे कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी २२ जुलै रोजी गुन्हा क्रमांक ०४६१/२०२६ नोंदविण्यात आला असून या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.

राज्यभर तुकाराम मुंढेंचा धडाका

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर नियमबाह्य औषधे, बनावट औषधसाठे, परवान्यांच्या अटींचे उल्लंघन, अंमली घटक असलेल्या औषधांचा बेकायदा साठा आणि अनधिकृत विक्री याविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांत सातत्याने छापे टाकून मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर आणि वितरकांवर गुन्हे दाखल करणे, परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया तसेच संबंधित औषधांची गुणवत्तराज्यभर सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे औषध वितरण साखळीवर प्रशासनाने अधिक कडक नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे.