नागपूर : महाराष्ट्रात चीज ॲनालॉगच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतानाही नागपुरातील दोन उत्पादकांकडे त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाने ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत केलेल्या कारवाईत दोन्ही डेअरींमधून २३,९६५ किलो अन्नसाठा, किंमत ४६ लाख ९३ हजार ४९० रुपये, जप्त केला. यातील १३,८६६ किलो साठा नष्ट करण्यात आला. याचदरम्यान बुटीबोरीतील एका कंपनीकडून लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याने ९,८२७ किलो तोस (रस्क) जप्त करण्यात आला.

चीज ॲनालॉगवर बंदी असताना साठा कुठे सापडला?

एफडीएच्या अन्न शाखेच्या पथकाने ६ ऑगस्टला मे. चंद्रा डेअरी, पिली नदी, वांजरा येथे तपासणी केली. दही, चीज ॲनालॉग आणि स्किम मिल्क पावडरचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित २२,०३५ किलो साठा, किंमत ४२ लाख ३० हजार ६९० रुपये, जप्त करण्यात आला. त्याच दिवशी मे. शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्स, ईंटा भट्टी चौक येथेही तपासणी करण्यात आली. तेथे उत्पादित चीज ॲनालॉगचा नमुना घेण्यात आला. त्यानंतर १,९३० किलो चीज ॲनालॉग, किंमत ४ लाख ६२ हजार ८०० रुपये, असा साठा जप्त करण्यात आला.

१३,८६६ किलो साठा का नष्ट करण्यात आला?

अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी ३० जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र. सीओएमएम/फुड/आदेश/पनीर/९८६-२०२६/७ नुसार महाराष्ट्रात चीज ॲनालॉगचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध आहे. त्यामुळे दोन्ही आस्थापनांमधील दही आणि चीज ॲनालॉगचा एकूण १३,८६६ किलो साठा, किंमत १२ लाख १६ हजार ६३० रुपये, नष्ट करण्यात आला.

बुटीबोरीतील कंपनीवरही एफडीएची कारवाई का?

एफडीएच्या पथकाने ७ ऑगस्टला मे. अजित डिलाइट प्रा. लि., प्लॉट क्र. एफपी-४५, ४६ व ४७, फूड पार्क, फाईव्ह स्टार औद्योगिक क्षेत्र, बुटीबोरी येथे तपासणी केली. तेथे रस्कच्या लेबलवर कृत्रिम गोडवा देणारा घटक आयएनएस ९.१ वापरल्याचा उल्लेख होता. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या चेतावणी आणि घोषणा लेबलवर नसल्याचे आढळले. त्यामुळे ९,८२७ किलो रस्क, किंमत १४ लाख १३ हजार ८५४ रुपये, जप्त करण्यात आला.

रस्कच्या लेबलवर कोणत्या घोषणा नव्हत्या?

लेबलवर ‘यामध्ये कोणता कृत्रिम/पोषणमूल्य नसलेला गोडवा देणारा घटक आहे’, ‘मुलांसाठी शिफारस केलेले नाही’ आणि अॅस्पार्टेम वापरल्यास ‘फेनिलकीटोन्युरिक्ससाठी नाही’ या आवश्यक घोषणा नमूद करण्यात आलेल्या नव्हत्या.

प्रतिबंधित अन्नपदार्थांवर आणखी किती कारवाई?

नागपूर विभागात ७ ते ९ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या कालावधीत दोन आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळले. संबंधित आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५,५०० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली. मात्र, या कारवाईत कोणतीही आस्थापना सील करण्यात आलेली नाही तसेच कोणतेही वाहन जप्त करण्यात आलेले नाही.