नागपूर : गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीनीला सर्पदंश झाल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात अग्निशमन सेवेचे प्रशिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांना सर्पदंशाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी एकाला सर्पदंश झाल्याची लक्षणे आणि पायावर दंशाच्या खुणा आढळल्या, तर दुसऱ्याच्या शरीरावर दंशाची खुण किंवा विषबाधेची लक्षणे आढळलेली नाहीत. कळमना येथील राज्य अग्निशमन अकादमीच्या प्रशिक्षण केंद्रात बुधवारी सकाळी शारीरिक प्रशिक्षणादरम्यान हा प्रकार घडला. एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना कधी आणि कुठे घडली?
कळमना अग्निशमन केंद्राच्या परिसरात राज्य अग्निशमन अकादमीचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे सुमारे ५४ प्रशिक्षणार्थी अग्निशामक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहेत. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना दोन प्रशिक्षणार्थींना पायाला काहीतरी चावल्यासारखे जाणवले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले.
सर्पदंश कोणाला झाला?
लातूर येथील यश साहेबराव इडेकर यांच्या पायावर दंशाच्या खुणा आढळल्या. शरीरातही सर्पदंशाशी संबंधित लक्षणे दिसल्याने विषारी सापाचा दंश झाल्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सर्पविषरोधक औषध दिले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
दुसऱ्या प्रशिक्षणार्थीची प्रकृती कशी आहे?
चाळीसगाव, जि. जळगाव येथील अक्षय प्रकाश हेलिंगे यांनाही सर्पदंशाचा संशय आहे. मात्र, त्यांच्या शरीरावर दंशाची खुण किंवा विषबाधेची लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वसाधारण कक्षात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.
घटनेनंतर प्रशासनाने काय केले?
घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी मेडिकलमध्ये जाऊन दोन्ही प्रशिक्षणार्थींची भेट घेतली आणि उपचारांची माहिती घेतली. कळमना अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी अकलिम शेख आणि अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयात तैनात करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षेचा प्रश्न का उपस्थित झाला?
प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रातील मैदानाचे गवत वेळेत का कापले गेले नाही, परिसराची नियमित स्वच्छता होते का आणि शारीरिक प्रशिक्षणापूर्वी मैदान सुरक्षित असल्याची खात्री कोण करते, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
