एक वर्षापूर्वी मी नागपूरमध्ये वास्तव्यास आले. इतिहासाची अभ्यासक म्हणून नागपूर शहर धुंडाळताना अनेक ऐतिहासिक ठिकाण, वस्त्या यांच्याशी भेट झाली. पण माझा शोध एक अशी जागा शोधण्याचा होता, ज्या जागेने मध्यप्रांत व वऱ्हाडातील विधवा, अनाथ अस्पृश्य मुलींना शिक्षणासाठी नागपूरला राहण्याचा आसरा दिला. त्यामुळे स्त्रियांच्या अनेक पिढ्या शिकल्या. नागपुरातील चळवळ ज्यांनी बळकट केली. अस्पृश्य महिलांचे एक निवासी वसतिगृह १९३३ ला सुरू झालेले. अनेकांना पत्ता विचारला. नवी शुक्रवारीत कितीतरी वेळा जाऊन आले. वसतिगृह कुठ गेले? त्याचं काय झालं असेल? हा विचार सतत मनात यायचा. एकदाचा शोध लागला व माझ्यातील इतिहास अभ्यासक आनंदी झाली.
पहिल्या अनाथ अस्पृश्य मुलींच्या वसतिगृहाची स्थापना अंजनाबाई व कृष्णराव देशभ्रतार या दोघांनी मिळून केली. त्यांच्याजवळ पैशाची व जागेची सोय नव्हती. त्यांनी आपले घरच वसतिगृह केले. अंजनाबाई शिकलेल्या व नागपूर नगरपालिकेत शिक्षिकापदावर होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय लोकमत तयार होत नसतं. त्यामुळे लोकांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन पैसा व धान्य गोळा केले. साधारणतः १९३१ पासून पैसा व अन्नधान्याची जमवाजमव करायला व मुलींनी शिक्षणासाठी नागपूरला येण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करणे यासाठी प्रयत्न सुरू केले. वसतिगृह सुरुवातीला नवीन शुक्रवारी येथे होते. सुरुवातीला वसतिगृह स्वतःच्या घरात तीन मुलींसह सुरू केले. सरकारी नियमांप्रमाणे रजिस्ट्रेशन वगैरे करून वसतिगृहाला स्थायीरूप देण्यात आले. यामधील सुरुवातीचे कार्यकारिणी ही अध्यक्ष वाय. एन. सुकटनकर डेप्युटी कमिश्नर नागपूर, उपाध्यक्ष दशरथ लक्ष्मण पाटील मालगुजार, भानुदास मून, खजीनदार संभाजी शिवाजी गोडघाटे, हिशेब तपासनीस हरिप्रसाद देवराव माणके, लेडी सुप्रिंटेंडेंट अंजनाबाई देशभ्रतार, सेक्रेटरी कृष्णराव तुकारामजी देशभ्रतार तर सदस्य सर आर.डब्ल्यू. फुले वकील, जी.टी. मेश्राम, भास्करराव नियोगी, एच.एन. गोखले, मिस डॉ. कराणी, सोनूताई सुळे, भागीरथीबाई नागपूर, धर्मदास नगरारे, भीमाशंकरबुवा बिलासपूर आदी १९३४ ला संस्थेच्या कार्यकारिणीवर सुरुवातीला होते.
या संस्थेला मदत मिळावी यासाठी देशभ्रतार दाम्पत्याने १९३४ ला दिलेल्या जाहिरातीत म्हणतात की, ‘मागासलेल्या जातीतील स्त्रीवर्गात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे मागासलेल्या समाजाच्याच उन्नतीला नव्हे तर किंबहुना आपल्या देशाच्या सुद्धा उन्नतीला अडथळा येतो, जोपर्यंत अस्पृश्य समाजातील स्त्रीवर्ग सुशिक्षित होणार नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजाला व त्याचप्रमाणे आपल्या देशालासुद्धा चांगली स्थिती प्राप्त होणे कठीण अस्पृश्य स्त्रिया सुशिक्षित झाल्या म्हणजे अर्थातच सर्व अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार होईल व मग खरोखरच अस्पृश्य वर्गाची सर्वांगीण उन्नती झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. अस्पृश्य वर्गाची उन्नती झाली म्हणजे आपल्या मातृभूमीची उन्नती हां हां म्हणता झालीच म्हणून समजावे.
म्हणूनच मागासलेल्या समाजातील स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांच्या हातून देशोन्नतीच्या कार्यात काहीतरी भर पडावी याच सद्हेतूने नागपूरला ‘एक अनाथ अस्पृश्य महिला वसतिगृह’ गेल्या वर्षापासून म्हणजे तारीख २३ ऑगस्ट १९३३ स्थापन करण्यात आले. करिता अस्पृश्य वर्गाच्या व मातृभूमीच्या उन्नतीप्रिय दयाळू बंधू-भगिनींना विनयपूर्वक नम्र विनंती करण्यात येते की, आपण मेहरबानी करून या ‘अनाथ अस्पृश्य महिला वसतिगृहाला’ हस्ते परहस्ते पैशाची अथवा धान्याची मदत करून भरभराटीला आणलं तर ही संस्था आपली आजन्म ऋणी राहील.’
जाहिरात वाचल्यावर असे कळते की, अस्पृश्य महिलांचा प्रश्न सोडवत असताना ते यात भारत देशाच्या उन्नतीचा विचार देखील करत आहे. सुरुवातीला ज्यांनी मदत केली ती मदत देताना सुद्धा दुरून नाणी भिरकावून व अपमानास्पद वागणूक देऊन करत. एकूण काय तर तत्कालीन कालखंडातील स्पृश्य मंडळींच्या मनात असलेली घृणा यातून दिसून येते. सुरुवातीच्या काळात वसतिगृहाच्या दृष्टीने अत्यंत हलाखीचा काळ होता. वसतिगृह गाडगा धरमपेठेत होते. वसतिगृहात मुलींची संख्या वाढली आणि वसतिगृहाच्या संचलनासाठी पैशाचा मेळ जमवणे अतिशय कठीण झाले. इथे असताना मुलींना शाळेत पायी जावे लागे. ना पायात चप्पल, ना रिक्षा, ना बस, ना सायकल. या वसतिगृहाच्या अधीक्षक काही काळ सुलोचनाबाई डोंगरे याही होत्या. धरमपेठेतील डिक डिस्पेंसरीच्या श्री. शेंडे यांच्या सायकलच्या दुकानाच्या बाजूला सुलोचनाबाई राहत. नंतर धरमपेठेतील लक्ष्मी सदन नावाच्या इमारतीत मामा रोडच्या पलीकडील लेनमध्ये वसतिगृह काही काळ होते. ‘सचिव नाना गजभिये आपल्या सायकलीला भाजीच्या पिशव्या अडकवून वसतिगृहात येत. मुलींच्या स्वयंपाकाच्या पळ्या नसत. एक महिला स्वयंपाक करी, जेवणाआधी प्रार्थना, झोपण्याआधी प्रार्थना अशी शिस्त. पाण्याची टंचाई म्हणून पहाटे उठून येणाऱ्या नळाशी दिवस उगवण्याआधी भेट. अशी वसतिगृहातील मुलींची दिनचर्या सुरू होत असे. या वसतिगृहात मराठी व इंग्रजी शिकणाऱ्या महार, चांभार, मांग, व भंगी जातीतील मुलींना प्रवेश मिळेल अशी जाहिरात कायम वृत्तपत्रातून येत असे. याचाच अर्थ आहे की, हे वसतिगृह अस्पृश्यामधील कुण्या एका जातीसाठी मर्यादित नव्हते. १९४२ च्या शे.का.फे. च्या स्थापनेच्या वेळी या वसतिगृहातील मुलींनी महत्त्वपूर्ण भूमिका बाजावली. वसतिगृहात सुगंधा शेंडे, चंद्रभागाबाई बोरकर, वासंती शेंडे, चंद्रभागा हिरेखण या मुली राहत होत्या.
नागपूरमधील धरमपेठ व धंतोलीसारख्या भागामध्ये हे वसतिगृह होतं. सुरुवातीला अंजनाबाई कामकाज बघत होत्या. कृष्णराव क्षयासारख्या दुर्जर आजाराने ग्रस्त झाले. पेंड्रा येथील टी.बी. सॅनिटोरियममधून त्यांनी इलाज केला. त्यांना पथ्ये जबर होती. १९४५ मध्ये ते कालवश झाले. याच काळात वसतिगृहाच्या सुप्रिटेंडेंट सुलोचनाबाई डोंगरे यांचाही मृत्यू झाला. नंतर १९४८ ला हे वसतिगृह बंद पडले. पण अंजनाबाई देशभ्रतार यांचं नंतरच्या काळात काय झालं? हा प्रश्न माझ्यासाठी आजही अनुत्तरित आहे. याच वसतिगृहातील विद्यार्थिनी कु. चंद्रभागा यांच्या भावाने हे वसतिगृह पुढे सुरू ठेवले.
वसतिगृह हा खेड्यापाड्यातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या अनेकांचे हक्काचे घर असते. वसतिगृहात राहून खरं जग विद्यार्थी बघतात. अस्पृश्य मुलींसाठी म्हणून विशिष्ट असं मला माहीत असलेलं हे एकमेव वसतिगृह आहे, त्या काळात सुरू झालेलं. या वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनींनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले. आजही हे वसतिगृह अस्तित्वात आहे. देशभ्रतार यांच्यानंतर या वसतिगृहाची वाटचाल कशी झाली यावर विस्ताराने नंतर कधीतरी…
