नागपूर : नागपुरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. डिलिव्हरी बॉयने केलेल्या कृत्यामुळे थेट ग्राहकांचे नुकसान झाले नसले तरी, ई-कॉमर्स वितरण कंपनीला मात्र जवळपास पाच लाखांचा फटका बसला आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालनगर येथील व्हीएनआयटी गेटसमोरील इन्स्टाकार्ट कंपनीच्या फ्लिपकार्टचे वितरण केंद्र आहे. तिथे संकेत संजय पतंगे (२५) ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या वर्धमाननगर येथील हबमधून ग्राहकांनी ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंचे वितरण केले जाते. कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा रमेश कालिदास सोनवणे (रा. इंदोरा, गोंदिया बसस्थानकाजवळ, गोंदिया) याच्यावर ग्राहकांपर्यंत पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी होती.
इन्स्टाकार्टच्या हबमधून पाच लाखांचा ऐवज लंपास
ग्राहकांच्या वस्तू घरपोच पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या डिलिव्हरी बॉयनेच कंपनीचा विश्वासघात करत सुमारे ४ लाख ८० हजार ५९५ रुपयांच्या ११७ शिपमेंटची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून डिलिव्हरी बॉयसह अन्य सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्वांचा शोध घेत आहेत.
लेखापरीक्षणात गैरव्यवहार उघडकीस
दरम्यान, २० जून २०२६ रोजी कंपनीने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला. १ एप्रिल ते २० जून २०२६ या कालावधीत कंपनीच्या हबमध्ये आलेल्या ११७ शिपमेंट ग्राहकांपर्यंत न पोहोचता त्या चोरीला गेल्या. सिस्टम रेकॉर्ड आणि ऑडिटमधून ही बाब स्पष्ट झाली.
महागड्या वस्तुंची अफरातफर
या शिपमेंटमध्ये ॲपल आयफोन १७, डीजेआय ॲक्शन कॅमेरा, ॲपल एअरपॉड्स प्रो, ब्रँडेड शूज तसेच इतर महागड्या वस्तूंचा समावेश होता. त्यांची एकूण किंमत ४ लाख ८० हजार ५९५ रुपये आहे. ऑडिटमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय रमेश सोनवणे याने इतर साथीदारांच्या मदतीने हा अपहार केल्याचा संशय कंपनीने व्यक्त केला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा सोनोने करीत आहेत.
ई-कॉमर्स वितरण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कंपनीने संपूर्ण ऑडिट अहवाल, सिस्टम रेकॉर्ड आणि संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली असून चोरी गेलेला ऐवज आणि आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेमुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या वितरण व्यवस्थेतील अंतर्गत सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
