scorecardresearch

पाच वर्षांनंतर पुन्हा नागपूर फ्लाईंग क्लब सुरू

आर्थिक चणचण आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे बंद पडलेले नागपूर फ्लाईंग क्लब पुन्हा नव्याने सज्ज झाले असून सोमवारी प्रशिक्षणास प्रारंभ झाला.

मनुष्यबळ, आर्थिक अडचणीतून क्लब बाहेर

नागपूर : आर्थिक चणचण आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे बंद पडलेले नागपूर फ्लाईंग क्लब पुन्हा नव्याने सज्ज झाले असून सोमवारी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी सुरू झालेला हा फ्लाईंग क्लब अनेक अडचणीतून पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील युवक-युवतींना कमर्शियल पालयट बनण्याच्या स्वप्नाला नागपुरातून पंख मिळणार आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त (महसूल) प्राजक्ता लवंगारे-वर्मा  म्हणाल्या की, तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाअभावी हा क्लब २०१७ ला बंद पडला होता. दरम्यान, सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील नागपूर उड्डाण क्लबच्या हँगर वैमानिक प्रशिक्षणाची सुरुवात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे हस्ते झाली. क्लबमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी डॉ. नितीन राऊत यांनी मागणी केली.

क्लबला आखणी काय हवे

क्लबकडे प्रशिक्षणासाठी चार विमाने आहेत. एमएडीसीने ५.९७ एकर जागा नवीन हँगर बांधकामासाठी दिली आहे. यामध्ये मल्टीइंजिन विमान, दोन सी-प्लेन, हेलिकॉप्टर आणि सिम्युलेटर ठेवण्याचा देखील प्रस्ताव आहे. यासाठी २० कोटी रुपये हवे आहेत.

क्लब उपकेंद्रचा प्रस्ताव

नागपूरला हवाई वाहतूक अधिक असल्याने फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणात काही मर्यादा येतात. त्यामुळे चंद्रपूर विमातळावर नागपूर फ्लाईंग क्लबचे उपकेंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. येथे सर्व सुविधा आहे, अशी माहिती मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जागतिक दर्जाच्या पर्यटन पूरक प्रस्तावांचे नियोजन करा

 नागपूर आणि विदर्भात विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागितक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल, अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना  आदित्य ठाकरे यांनी केली. जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, अभिजित वंजारी, राजू पारवे, नरेंद्र बोंडे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वविद् विजयकुमार नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडहाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, राज्य पुरातत्त्व विभागाच्या जया वाहने यासह पर्यटन, पर्यावरण विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

पर्यटनाचे  राष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करा

पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करावा. मध्यप्रदेशच्या धर्तीवर युको टुरिजमचा विकास करण्यात यावा. विदर्भातील पर्यटनाचे मुंबई व राष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यात यावे, आदी मागण्या पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या. आमदार आशीष जयस्वाल यांनी पर्यटन प्रस्तावाला मान्यता देण्यासोबतच सर्व ठिकाणी प्लास्टिक बंदीबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

नागपूर उड्डाण क्लबला आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जाईल. क्लब पुन्हा सुरू झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमान उड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

– आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरण मंत्री.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur flying club started five years ysh

ताज्या बातम्या