नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि वेगवान करण्यासाठी उड्डाणपूल बांधले जात आहे. मात्र नियोजनाचा अभाव, पुलांच्या संरचनेतील त्रुटी यामुळे शहरातील उड्डाणपूल समाधानाऐवजी समस्याच अधिक ठरत आहेत. मागील एका दशकात शहरातील उड्डापुलांची संख्या तीनपट झाली असली तरी वाहतूक खोळंबा कमी होण्याऐवजी वाढला आहे.

शहरांची वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी यावर उड्डाणपुलांची निर्मिती एक उपाय मानला जातो. शहरात २०१३ मध्ये १२ उड्डाणपूल होते. २०२५ च्या अखेरपर्यंत यात तब्बल तीनपट वाढ होऊन आता दोन डबलडेकर पुलांसाह एकूण ३५ उड्डाणपूल आहेत. याशिवाय १५ उड्डाणपुलांचे काम सुरू झाले किंवा प्रस्ताव तयार आहे. २०१३ मध्ये शहरात वाहनांची संख्या १३ लाख होती, जी आता २०२५ मध्ये २२ लाखापर्यंत वाढली. वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात उड्डाणपुलांची निर्मिती अत्यावश्यक बाब आहे. मात्र त्याची संरचना करताना नियोजनचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. विशेषत: उड्डाणपुलांच्या लँडिंग पाईंटमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवते. काही पुलांचे अपवाद वगळले तर प्रत्येक पुलांचे लँडिंग पाईंट वाहतूकीसाठी अडथळा ठरत आहेत.

सदर पूल उभारणीत त्रुटी

सदरचा उड्डाणपूल हा याबाबत सर्वाधिक कुप्रसिद्ध आहे. त्याची उभारणी करताना मानकापूर तसेच जुना काटोल चौक नाक्याकडील भाग तयार करताना जी ‘बुद्धिमत्ता’ दाखवण्यात आली आहे, ती सदरकडील भागात हरवलेली दिसते. या पुलाचा एक चढण्याचा भाग संविधान चौकातून कायम ठेवत, उताराचा भाग एलआयसी चौकाकडे दिला असता तर एलआयसी चौकाचा मार्ग कधीही बंद करण्याची वेळ आली नसती. हा रस्ता बंद केल्यामुळे सध्याचा सर्वाधिक लांब ५.६ किमीचा एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक उड्डाणपूल वाहनांसाठी बिनकामाचा ठरतोय. या पुलावर वर्दळीचा वेळातही अगदी बोटावर मोजण्या इतकीच वाहने धावतात आणि त्याच काळात पुलाखाली शेकडो वाहनांची गर्दी होते.

आरटीओ उड्डाणपुलामुळेही समस्या

लँडिंग पाईंटच्या चुकीबाबत अमरावती मार्गावरील आरटीओ उड्डाणपूलही एक महत्त्वाचे उदाहरण आहे. विद्यापीठ चौकाच्या दिशेने जाणार रस्ता या पुलामुळे फारच अरुंद झाला. शिवाय चौकाकडे चढाव असताना त्यापूर्वीच पुलाचा उतार काढण्यात आला, ज्यामुळे तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. बोले पेट्रोल पंप चौकाच्या दिशेनेही उतार देताना नियोजनाचा अभाव ठेवल्याने शेवटी वृक्ष तोडण्याची वेळ आली. कावरापेठ, पारडी उड्डाणपुलांच्या नियोजनातही त्रुटी दिसून येतात.

नवे पूलही नियोजनहीनच

शहरात मोठ्या प्रमाणावर उड्डाणपुलांचे काम सुरू आहेत. मात्र या पुलांच्या उद्घाटनापूर्वीच यांच्या संरचनेतील त्रुटी स्पष्टपणे उघड होतात. सर्वाधिक प्रचारित इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे ताजबागजवळ लँडिंग देण्यात आले, मात्र यामुळे शेजारील सर्व्हिस रस्ते अरुंद झाले. उमरेडकडील या मार्गावर बहुतांश बस, ट्रॅव्हल्सची वाहतूक आहे. त्यामुळे केवळ एकपदरी रस्ता उरल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. सर्वाधिक लांबीचा या प्रकल्पात महाल, पाचपावली भागात अतिशय कमी जागा असल्याने तीनपदरी पूल तयार करण्यात आला. मात्र दिघोरी, ताजबाग, भांडे प्लाट भागात मुबलक जागा असताना तिथेही तीनपदरीच संरचना आहे. या भागातील वाहतुकीचा अभ्यास करून सहजरित्या चारपदरी पूल तयार झाला असता. रेशीमबाग चौक ते केडीके महाविद्यालय रस्त्यावरील नवनिर्मित पूल हा थेट चौकात उतरतो. सुरेश भट सभागृहात कायम कार्यक्रमांची रेलचेल असताना, ही संरचना अडचणीची ठरणार आहे.

पिलर्समुळे अपघातांचा धोका

उड्डाणपुलांच्या संरचनेतील आणखी एक महत्त्वाची त्रुटी म्हणजे पिलर्स उभारताना न केेलेला विचार. अनेक ठिकाणी हे पिलर्स रस्त्यांची रुंदी कमी करतात तसेच अपघातांसाठी कारणीभूत ठरतात. इंदोरा – दिघोरी उड्डाणपुलाच्या महालमधील भागात पिलर्सला लागूनच यू-टर्नसाठी जागा देण्यात आली. पिलर्स तयार करताना शेजारील रस्त्यांचा अभ्यास न केल्यामुळे ही स्थिती उद्भवते. जगनाडे चौकात भर चौकात पिलर्स टाकण्यात आले आहे. हसनबाग ते वर्धमान चौकादरम्यानच्या नवनिर्मित उड्डापूलाचे पिलर्सही भर रस्त्यात आहेत. शहरात मेट्रोचे जाळे उभारताना तयार करण्यात आलेले पिलर्स योग्य नियोजनाचे करण्यात आले. उड्डाणपुलांचे आराखडे तयार करणाऱ्यांनी मेट्रोकडून धडा घेण्याची गरज आहे.

काय करता येईल?

  • उड्डाणपूल अत्यावश्यक असले तरी अभ्यास केल्याशिवाय नवे पूल तयार करण्यात येऊ नये.
  • लँडिंग पाईंट निश्चित करताना वाहतुकीचे विश्लेषण, रस्ता रुंदी करण्यासाठी जागेची उपलब्धता याचा विचार व्हावा.
  • पिलर्स तयार करताना शेजारील रस्ते, वस्त्या, सध्याचे यू-टर्न याचा अभ्यास करावा.
  • दोन किमीपेक्षा लांब उड्डाणपूल असल्यास विविध एन्ट्री-एक्झिट पाईंट असावे.
  • लँडिंग पाईंट पुढील चौकाच्या किमान तीनशे मीटर पूर्वी असावे.

नागरिक काय म्हणतात?

गरजेनुसार नियोजन व्हावे

नागपूर शहरातील बरेचशे रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसे रुंद आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उड्डाणपूल निर्मितीची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी पूल उभारण्याऐवजी जिथे अत्यावश्यक आहे, तिथेच पूल तयार करण्यात यावे. – सौरभ गंधारे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष द्या

पूल वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाही. रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी केल्यानेच समस्या सोडवली जाऊ शकते. यासाठी पुलांऐवजी मेट्रोसारख्या पर्यायांवर अधिक भर देण्याची गरज आहे. – रोहन बगमारे

नियोजनात नागरिकांना सहभागी करा

उड्डाणपुलांचे नियोजन करताना नागरिकांना सहभागी करून घ्यावे. अनेदा नागरिकांना वर्तमानपत्रातूनच माहिती मिळते. पुलांच्या संरचनेबाबत अस्पष्टता असते. यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. – आकाश भोयर, नागपूर</p>

तज्ज्ञांचे मत काय?

आराखड्यावर प्रश्नचिन्ह

शहरातील बहुतांश पुलांचे आराखडे चुकीचे आहेत. ते तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहतात. काटोल आणि मानकापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सदर उड्डाणपूल बांधला मात्र चुकीच्या आराखड्यामुळे कामठी मार्ग बंद झाला. त्या मार्गावरील वाहतुकीचा भार इकडे आला. रामझुलामुळे रेल्वे स्टेशनचा मार्ग बंद झाला आणि नंतर नव्याने पूल तयार करावा लागला. बहुतांश उड्डाणपूल धबधबे झाले आहेत. निदान रस्ते व वाहतूक मंत्र्यांच्या मतदारसंघात ही स्थिती निर्माण व्हायला नको. – ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ अधिवक्ता (पुलांच्या जनहित याचिकेत न्यायालयीन मित्र)

अतिघाई केल्याने चुका

उड्डाणपूल आराखडा आणि वास्तव निर्माण यात मोठा फरक असतो. शहरातील अनेक प्रकल्प घाईघाईने होत असल्यामुळे अनेक चुका होतात. छत्रपती चौक पूल, गणेश टेकडी पूल तयार करून पाडण्यात आले. अनेक भागात मागणी नसतानाही पूल तयार होत आहेत. मी किती निधी आणला, हाच निकष सध्या प्रसिद्ध होत आहे. यामुळे विकास कामांचा भडिमार होत आहे. इतक्या विकास कामांसाठी निधी कुठून येतो, याकडे कुणीही लक्ष देत नाही. – प्रदुम्न सहस्त्रभोजनी, आर्किटेक्ट

उड्डाणपूल फायद्याचेच

शहरातील उड्डाणपूल ही नागरिकांच्या फायद्यासाठीच आहेत. ही तयार होताना थोडा त्रास होतो, मात्र भविष्यात याचा फायदा होणार आहे. कुणीही नियोजन करताना त्रास होईल या भावनेने काम करत नाही. प्रशासनाद्वारे विकासकामांचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांना विश्वासात घेतले जाते. – आदित्य मिरखेलकर, वाहतूक पोलीस उपायुक्त