नागपूर : फुटाळा तलावातील बहुचर्चित म्युझिकल फाउंटेन सुरू झाल्याची माहिती रविवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच नागपूरकरांनी फुटाळा तलावाकडे धाव घेतली. फाउंटेनचा शो पाहण्यासाठी कुटुंबीयांसह नागरिक मोठ्या संख्येने फुटाळ्यावर पोहोचले. मात्र, प्रत्यक्षात फाउंटेन सुरू झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांचा चांगलाच ‘पोपट’ झाला. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अफवा पसरल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

गडकरींचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’

फुटाळा तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा आणि नागपूरला पर्यटनाच्या नकाशावर वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने म्युझिकल फाउंटेन आणि लाईट शो प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पैकी एक समजला जातो. तलावाच्या पाण्यावर उंच फवारे, रंगीत प्रकाश आणि डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून नागपूरचा इतिहास सादर करण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे. प्रेक्षकांसाठी सुमारे चार हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याची नागपूरकरांना अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे.

फुटाळ्यावर झाला हिरमोड

याच उत्सुकतेचा फायदा घेत फाउंटेन सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियावरून किंवा अन्य माध्यमातून पसरल्याचे दिसून आले. माहितीची खातरजमा न करताच अनेक नागरिकांनी फुटाळा गाठला. सुरुवातीला काही जण, त्यानंतर कुटुंबे आणि तरुणांचा ओघ वाढत गेला. पाहता पाहता तलाव परिसरात मोठी गर्दी झाली. फाउंटेनचा शो सुरू होईल, या अपेक्षेने नागरिक बराच वेळ थांबून राहिले. मात्र शो सुरू होण्याची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने नागरिकांमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर फाउंटेन सुरू झाल्याची माहितीच चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोड झाला.

प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येण्यापूर्वीच..

फाउंटेन सुरू झाल्याची अफवा एवढ्या वेगाने पसरली की प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येण्यापूर्वीच मोठ्या संख्येने नागरिक फुटाळ्यावर पोहोचले. त्यामुळे गर्दीचे नियोजन, वाहतूक आणि नागरिकांना योग्य माहिती देण्याची यंत्रणा याबाबतही प्रश्न उपस्थित झाले. नागरिकांना फाउंटेन सुरू होण्याची अधिकृत तारीख, वेळ किंवा शोचे वेळापत्रक स्पष्टपणे उपलब्ध नसल्यामुळे अशा अफवांना वाव मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासनाने अधिकृत माध्यमातून माहिती देणे आणि अफवा पसरू नयेत यासाठी तत्काळ स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोट्यवधींचा प्रकल्प अजूनही प्रतीक्षेत

फुटाळा म्युझिकल फाउंटेन प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि न्यायालयीन बाबींमुळे काम रखडले आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणामुळे प्रकल्पावर स्थगिती असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष फाउंटेन सुरू होण्याची अधिकृत प्रक्रिया अद्याप महत्त्वाची ठरते.