नागपूर : रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या बाबतीत विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात समाधानकारक बातमी समोर आली आहे. अपघात मृत्यू दर कमी करण्यात विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर तर नागपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
विशेष म्हणजे रस्ते अपघातात दगावणाऱ्यांची संख्या नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २९५ पर्यंत २३ टक्क्यांनी कमी झाल्याने नागपूर जिल्ह्याने अपघात मृत्यूदर रोखण्यात राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी प्राणांतिक अपघाताच्या ८१३ तर या वर्षी ७०८ घटना घडल्या. यात गेल्या वर्षी दगावलेल्या ३८५ जणांच्या तुलनेत मृत्यू दर २९५ इतका २३ टक्के कमी झाला आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली राज्यात अव्वल….
अपघाती मृत्यू दर कमी करण्यात गडचिरोलीने २६ टक्के आवर घालत राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे. गडचिरोलीत २०२५ मध्ये झालेल्या १२९ प्राणांतिक अपघातांची संख्या २०२६ मध्ये ९६ वर कमी झाली आहे.
एकूण अपघातांमध्ये देखील नागपूर जिल्ह्यात १३ टक्के घट झाली. तर धाराशिवने मृत्यू दरात ३३५ वरून २६४ इतकी २१ घट नोंदवत तिसरे स्थान पटकावले. नाशिक शहर व अकोलाने अपघाती मृत्यूमध्ये २० टक्के घट नोंदववली. संपूर्ण राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान एकूण अपघाती मृत्यूमध्ये १३ हजार १७५ वरून १२ हजार ६४५ इतकी ४ टक्के घसरण झाली आहे.
नागपूर ग्रामीण पहिल्या पाच जिल्ह्यांच्या रांगेत….
नागपूर जिल्ह्यात गंभीर अपघातांमध्ये जायबंदी होणाऱ्यांची संख्या मात्र अंशतः कमी झाली असून हे प्रमाण ८५५ वरून जेमते ८४४ पर्यंत कमी झाले आहे. चालू वर्षात रस्ते अपघातातील मृत्यू दर कमी करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांच्या रांगेत नागपूर ग्रामीणने स्थान मिळवले आहे.
