नागपूर : केंद्र व राज्य शासनाकडून एकीकडे गरजे इतका गॅस सिलिंडरचा साठा असून नागरिकांना सुरळीत पुरवठा होत असल्याचा दावा केला जातो. तर दुसरीकडे नागपूरसह राज्याच्या अनेक भागात घरगुती सिलिंडरसाठीही नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे मोठ्या रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसते. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील बेसा- पिपळा परिसरात घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून व्यवसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याचा काळाबाजार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर काळाबाजार करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नागपुरातील वाडीसह इतरही काही शहरालगतच्या भागात गॅस एजंसीच्या गोदामापुढे नागरिकांच्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी रांगा लागत असल्याचे चित्र आजही आहे. दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांसह स्थानिक प्रशासनाकडून सिलिंडरच्या पुरवठा सुरळीत रहावा म्हणून गॅस एजेंसिवर लक्ष केंद्रीत केल्याचा दावा केला जातो. त्यात एजेंसीची वेळोवेळी तपासणी करून अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. त्यानंतरही नागपुरात सिलिंडरची काळाबाजारी करणारी टोळी सक्रीय आहे. नागपूर शहर अन्न व पुरवठा विभागाला याबाबत तक्रारीही मिळाल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी सकाळी बेसा- पिपळा परिसरात भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यवसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. पुरवठा विभागाच्या पथकाने शिताफीने कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला. हा परिसर नागपूर ग्रामीणच्या अखत्यारित असल्याने शेवटी हे प्रकरण नागपूर ग्रामीण पुरवठा विभागाला हस्तांतरीत केले गेले.
प्रकरण काय?
अन्न व पुरवठा विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला असता, घरगुती एलपीजी सिलिंडरमधील गॅस मोठ्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना संबंधितांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरची उपलब्धता कमी असल्याचा फायदा घेत ही टोळी गॅस चोरी करून काळाबाजारात अवास्तव किमतीत व्यवसायिक सिलिंडरची विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
टोळीमागील मुख्य सूत्रधार कोण?
अन्न व नागरी पुरवठा विभागाने या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मात्र, या टोळीमागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध अद्याप सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
