प्रद्युम्न सहस्रभोजनी
शहरांची मूळ नैसर्गिक/भौगोलिक परिस्थिती आणि त्यानुसार निर्माण झालेली तिथली संस्कृती यामुळे शहरे सुरुवातीला वैशिष्ट्यपूर्ण असतात. पुढे त्यांचा व्याप अनिर्बंध वाढतो तेव्हा ही वैशिष्ट्ये पुसट होत जातात आणि सगळी शहरे एकसारखी दिसू लागतात. नागपूरचे नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीवर आधारित वेगळेपण मात्र सहजपणे पुसले जाण्यासारखे नाही. या वेगळेपणाचे कारण साडेसहा कोटी (६५ मिलियन) वर्षे जुने आहे… ‘प्लेट टेक्टोनिक्स’च्या थरारनाट्याचा भाग… जे डायनासॉर्स नामशेष होण्यासाठीही काही अंशी कारणीभूत होते…! जेव्हा भारतीय टेक्टोनिक प्लेट (ज्याचा समुद्रापातळीवरील जमीन म्हणजे भारत, श्रीलंका आणि त्यांना जोडणारा सेतू) आफ्रिका/मादागास्करपासून तुटून दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे ‘वेगाने’ प्रवास करताना खालून ‘रियुनियन’ द्वीपावर घासत गेली; ज्यामुळे भारताच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर लक्षावधी वर्षे (छत्तीस वेळा) पुन्हापुन्हा ज्वालामुखींचा उद्रेक होत राहिला. या ज्वालामुखींमधून लाव्हा पश्चिमेस समुद्रात वाहत होता तर पूर्वेकडे दख्खनचे पठार निर्माण करीत होता. यातूनच सह्याद्री पर्वतरांगा (Western Ghats) निर्माण झाल्या. ज्या जुन्या खडकांवरून लाव्हा वाहात गेला त्यांना क्रेटॉन्स असे नाव आहे आणि ते पृथ्वीवरील सगळ्यात जुन्या खडकांपैकी आहेत, तर ब्लॅक बेसाल्ट म्हणजे काळे कातळ, सगळ्यात कमी वयाच्या खडकांपैकी आहेत. या दोघांना वेगळ्या करणाऱ्या रेषेला भूवैज्ञानिक विभाजन (जिओलॉजिकल डिव्हाईड) असे म्हटले जाते. नागपूर शहर या वैशिष्ट्यपूर्ण ‘जिओलॉजिकल डिव्हाईड’च्या वेशीवर वसलेले आहे; त्याची चित्तवेधक चिन्हे आणि परिणाम नागपूर शहरात व सभोवताली आपल्याला बघायला मिळतात.
नागपूरच्या पश्चिम वेशीवर जिथे लाव्हाचा प्रवाह येऊन थांबला तिथे थोड्याफार उंचीचा कडा (Cliff) आहे. या कड्याच्या काठाकाठाने अंबाझरी बगीच्याकडून फुटाळा तलावाकडे जाणारा रस्ता आहे. येथून स्पष्टपणे दिसते की बाकीचे शहर या रस्त्यापेक्षा निदान दहा-पंधरा मजली इमारतींइतके खाली आहे. शहरात पूर्वेकडे उतार आहे आणि पश्चिमेकडे सौम्य चढाव आहे ज्याचा शेवट पुढे थेट सह्याद्रीच्या माथ्यावर होतो. भूवैज्ञानिक फरकामुळे नागपूरच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भूभागांतील जैवविविधतेतही खूपच फरक आहे. नागपूरच्या पश्चिमेकडे गवताळ किंवा ‘विपुल दर्भाचा’ प्रदेश आहे, ज्यामुळे या प्रदेशाला ‘विदर्भ’ या नावाने ओळखले जात असे. पूर्वीचा विदर्भ (ज्याला वऱ्हाड असेही म्हणत) संपूर्णतः नागपूरच्या दक्षिण-पश्चिमेला या काळ्या दगडांवर आणि त्यापासून निर्माण झालेल्या मुरुमावर आणि काळ्या मातीवर (ब्लॅक कॉटन सॉइलवर) होता. या गवताळ प्रदेशात अर्थातच गवळ्यांचे, पारध्यांचे वास्तव्य आणि गवळी कुळाचे राज्यदेखील होते. हा प्रदेश भारतातील दूधदुभत्याचा आणि इतर संसाधनांचा संपन्न प्रदेश होता. ब्रिटिशांना, त्यांच्या इंग्लिश भाषेच्या मुळात असलेल्या कुंठित करणाऱ्या मर्यादांमुळे गंगा, हिमालय, योग, अशा साध्या शब्दांचा सुद्धा उच्चार करता येत नाही, त्यामुळे त्यांच्या काळात वऱ्हाडचे ‘बेरार’ झाले, ज्याचे शासकीय नाव आता ‘अमरावती डिव्हिजन’ असे आहे.
सध्याच्या विदर्भात नागपूरच्या पूर्वेकडील जिल्हे देखील जोडलेले आहेत, ज्यांची पूर्वीची ओळख ‘झाडीपट्टी’ म्हणजे जंगलांचा प्रदेश (दर्भाचा नव्हे) अशी होती. या दोन प्रदेशातील अर्थव्यवस्था आणि चालीरीती अगदी वेगळ्या होत्या. जंगलांचा प्रदेश म्हणजे पूर्वीचे दंडकारण्य, ज्याला ब्रिटिश काळापासून गोंडवाना (गोंडांचा प्रदेश) असे म्हटले जाऊ लागले. हे दंडकारण्य किंवा गोंडवन आजही थेट झारखंड, प. बंगाल, ओडिशापर्यंत आहे. इथले गोंड भारतातील खरे ‘स्वतंत्र’ लोक. हे लोक शेती न करता नेहमी जंगलांच्या आधाराने जगत राहिले व कधीच कुठल्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली आत्तापर्यंत आले नव्हते. या जंगलांना भेट देणाऱ्यांना सहसा नागपूर शहरातूनच प्रवास करावा लागत असे, त्यामुळे नागपूरला इंग्रजांनी ‘गेटवे टू सेंट्रल इंडियन फॉरेस्ट्स’ अशी संज्ञा दिली.
नागपूरच्या उत्तरेला सातपुडा पर्वतराजीत सुद्धा गोंडांचे आणि इतर आदिवासींचे वास्तव्य होते. इथली जंगलेही टिकून राहिली. मोगलांचे राज्य संपुष्टात येत असताना या भागातून उतरून मैदानी भागात गोंडांनी आपलेही राज्य स्थापन व्हावे असा प्रयत्न केला, पण तो फार टिकला नाही.
या प्रदेशातील संसाधनांची लूट करण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारे जुलूम जबरदस्ती केली. ‘विदर्भातील’ स्थानिकांना काळ्या मातीच्या गवताळ प्रदेशात कापूस उत्पादन करावयास लावले (ज्याचा सध्याचा दुष्परिणाम म्हणजे शेतकरी आत्महत्या), जंगलातील संसाधने पद्धतशीरपणे लुटण्यासाठी वनविभाग निर्माण केला. झाडीपट्टीत खनिज उत्खनन सुरू केले, ज्यात आता वाढ होते आहे आणि तिथेच त्याधारित प्रदूषणकारी उद्योगही स्थापन केले जाताहेत. महाराष्ट्रातील ९७ टक्के खनिजे नागपूरच्या दक्षिण-पूर्वेस, भूवैज्ञानिक भाषेत Geological Paradise अशी संज्ञा असलेल्या झाडीपट्टीत सापडतात. याचा बहुतांश आर्थिक फायदा पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर आगंतुक घेतात. ही लूट सुरू असेपर्यंत विदर्भाला महाराष्ट्रापासून मुक्तता नाही.
नागपूर शहर भारतीय उपखंडात मध्य स्थानी असणे (झिरो माईल) हे अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण आहे; पण त्याचाही फारसा आर्थिक किंवा राजकीय फायदा शहराला झाला नाही. महाराष्ट्रात हट्टाने ओढण्याआधी नागपूर शहर हिन्दी भाषिक ‘मध्यप्रदेश’ प्रांताची राजधानी होती. आता मात्र नागपूर ना धड मध्यभारतीय हिन्दी पट्ट्यात, ना खऱ्या अर्थाने पश्चिम भागात, ना उत्तरेस, ना दक्षिणेत अशाप्रकारे ओळख हरवून बसले आहे.
पण या हरवण्याचा चांगला परिणाम म्हणजे इथले शांतीपूर्ण सह-अस्तित्व. पूर्वीपासून ‘हिन्दी बेल्ट’ मध्ये असल्यामुळे नागपुरात मराठीचा प्रभाव कमी, आणि तसा आग्रहसुद्धा नाही. भारताच्या मध्यभागी असल्यामुळे इथे सगळ्या दिशांतून वेगवेगळ्या भाषा आणि चालीरीती असलेले लोक स्थायिक झाले. यामुळे भाषा, प्रांत, आणि धर्म, जात, याबाबतीत लोकांमध्ये बरीच सहिष्णुता आहे. या स्थितीत बदलासाठी काही दशकांपासून सहेतुक प्रयत्न होत आहेत आणि त्याचकाळात तशी भूमिका नसणाऱ्यांनी नागपूर शहर दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध केले आहे.
नागपूरचे एक विलक्षण वैशिष्ट्य असे आहे की इथल्या नागनदीचे मूळ शहराच्याच पश्चिम वेशीवरील लावा गावशिवारात घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या टेकड्यांमध्ये आहे. पंचवीस वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकवस्ती नव्हती, पण आपल्या नेत्यांनी आणि अधिकारीवर्गाने १९९८-९९ च्या सुमारास येथे वस्त्या निर्माण करण्याचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय जाणीवपूर्वक राबवून नागनदीच्या उगमची रया घालवली.
देशातील शहरालगतच्या इतर नद्यांप्रमाणे नागनदीत सुद्धा वर्षभर केवळ सांडपाणीच वाहते; पण जमेची बाजू अशी की उगम शहरातच असल्यामुळे ठरवले तर या छोट्या नदीला शहरातच शुद्ध करता येणे अशक्य नाही आणि तसे झाल्यास हे उदाहरण इतर शहरांसाठी व नद्यांसाठी देखील घालून देता येईल. यासाठी साधा, स्वस्त आणि टिकाऊ उपाय आहे; तो असा की, ज्या प्रत्येक घरातून/सोसायटीतून किंवा झोपडपट्टीतून सांडपाणी निर्माण होते तिथेच, अगदी साधे, कमी खर्चाचे, कुठलेही रासायनिक पदार्थ किंवा वीजवापर न लागणारे संयंत्र लावून सांडपाण्याचे ८५-९० टक्के पर्यंत शुद्धीकरण करता येते. या उपाययोजनेसंदर्भात विस्तृत विवेचन माझ्या खालील लेखामध्ये आहे. (क्रमशः)
(https://www.academia.edu/47689021/At_Source_Upstream_Sewage_Treatment_is_ the_prescription_For_Saving_the_Rivers_in_India)
Email: sahasrabhojanee@gmail.com
