नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नवनवीन कल्पना व प्रकल्पांची प्रशंसा देश-विदेशातील नावाजलेले व्यक्ती करताना थकत नाहीत. आता गडकरींनी शनिवारी नागपूर शहरातील एका फ्लॅश चार्जिंग बस प्रकल्पाबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली. या बसमध्ये वाहन सुंदरी असेल आणि चहा नाश्ताही.
नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पात नागपूर शहराचाही समावेश आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सी. ए. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेत नागपुरातील फ्लॅश चार्जिंग बस प्रकल्पाची माहिती दिली. या बसबाबतची निविदा प्रक्रिया कालच झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, ही वातानुकुलीत बस नागपुरातील बायबास रोडवर धावणार आहे. या उच्च प्रतिच्या मोठ्या बसमध्ये १३५ प्रवाशांच्या बसण्याची सोय आहे. या बसची आसने उच्च दर्जाची आहेत. बसमध्ये टी. व्ही. असणार आहे. त्यावर प्रवाशांचे मनोरंजन होईल. विमानात राहत असलेल्या हवाई सुंदरीच्या धर्तीवर वाहन सुंदरी असेल. ही सुंदरी प्रवाशांना चहा- नास्ता उपलब्ध करून देईल. ही बस सेवा जगातील सर्वोत्कृष्ठ बससेवेपैकी एक राहणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे या हायटेक बसकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
तिकीट दराबाबतही महत्वाचे…
फ्लॅश चार्जिंग बसच्या टिकीट शुल्काबाबतही गडकरी यांनी महत्वाची माहिती दिली. गडकरी म्हणाले, डिझेलवर आधारित बसच्या तुलनेत फ्लॅश चार्जिंग बसचे तिकीट सुमारे ३० टक्क्यांनी कमी राहणार आहे. त्यामुळे ही बस सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे चांगले साधन असेल.
३० सेकंदात चार्जिंग
उपराजधानीत प्रस्तावित फ्लॅश चार्जिंग बसमध्ये फ्लॅश- चार्जिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे ही बस निश्चित बस थांब्यावर येताच तेथील कर्मचाऱ्यांकडून लगेच ३० सेकंद जलद गतीने चार्ज केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर फ्लॅश चार्जिंग बसची बॅट्री चार्ज होत जाईल. त्यामुळे एकीकडे प्रवाशांचा वेळ वाचेल तर दुसरीकडे वेळोवेळी चार्जिंग होत असल्यामुळे बस जास्त कालावधीपर्यंत सेवा देऊ शकेल.