नागपूर : ‘आई.. मला माफ कर… दहावीचे वर्ष असल्यामुळे मी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते.. पण मी इंस्टाग्रामच्या नादाला लागले… आता अभ्यासाची भीती वाटायला लागली…म्हणून मी आता जग सोडून जात आहे…’ अशी सुसाईड नोट लिहून एका पोलीस हवालदाराच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूर्णा निलेश ढोणे (१५, रा. महालक्ष्मीनगर, बाकडे सभागृहाजवळ, हुडकेश्वर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वडील निलेश ढोणे हे नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत. हवालदार निलेश ढोणे यांना दोन मुली असून मोठी मुलगी पूर्णा ही दहाव्या वर्गात शिकते. तर लहान मुलगी आठवीत आहे. पूर्णाला दहावीचा अभ्यासक्रम कठीण वाटत होता. वर्गात शिकवलेले तिच्या लक्षात येत नव्हते. अभ्यासासह गृहपाठही नीट करता येत नव्हता. त्यामुळे पूर्णा ही गेल्या महिन्याभरापासून नैराश्यात गेली होती. अभ्यास करताना तिला नेहमी नापास होण्याची भीती वाटत होती. तसेच तिला मोबाईलवर इंस्टाग्रामवरील व्हिडीओ बघण्याचा छंद होता. त्यामुळे आई-वडील वारंवार तिला अभ्यासावर लक्ष देऊन मोबाईलचा नाद सोडण्यासाठी सांगत होते. शाळेत गेल्यानंतरही तिचे अभ्यासात मन लागत नव्हते. नैराश्यात गेलेल्या पूर्णाकडे कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले. रविवारी रात्री दहा वाजता पूर्णाने आई व बहिणीसह जेवण केले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली. हेही वाचा - ‘अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांना रवी राणांच्या धमक्या’, भाजपच्या नेत्याचा आरोप नैराश्यात असलेल्या पूर्णाने आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास झोपेतून उठलेल्या आईला पूर्णा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आईने मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे अन्य कुटुंबसुद्धा जागे झाले. पूर्णाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मोबाईलचा नाद नडला पूर्णा ही नेहमी इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर राहत होती. तसेच ती ऑनलाईन गेमही खेळत होती. त्यामुळे तिला वडिलांना आणि आईने अनेकदा आरडाओरड केली. रविवारी साडेबारा वाजता घरी आलेल्या वडिलांना पूर्णा पुन्हा मोबाईलवर इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघताना दिसली. त्यामुळे त्यांनी तिला मोबाईल सोडून अभ्यास करण्यास सांगितले. मात्र, तिला मोबाईलचा मोठा नाद लागला होता. हातातून मोबाईल हिसकल्यास तिला अस्वस्थ वाटायला लागायचे. मोबाईलचाच नाद तिला नडला आणि तिने आत्महत्येचा पर्याय निवडला. हेही वाचा - …तर ‘एकही भूल कमल का फूल’ असा नारा देवू, कोणी दिला असा इशारा? माझ्या बहिणीला सर्व वस्तू द्या आई-बाबा सॉरी. मोबाईलचे मला व्यसन लागले. अभ्यास नकोसा वाटतोय. माझ्या शिक्षणावर तुम्ही खूप खर्च केला. त्याची मला जाणीव आहे. माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व कपडे लहान बहिणीला द्या. माझ्या चपला आणि नवीन शूजसुद्धा तिला द्या. लहान बहिणीला शिकवा. मला कुणीही समजून घेतले नाही. मी जात आहे, असे लिहून पूर्णाने आत्महत्या केली.