Nagpur railway bypass project : नागपूर : नागपूर मुख्य रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने कळमना ते गोधनी दरम्यान १३.७ किलोमीटरचा नवा बायपास मार्ग सुरू करण्याचे काम हाती घेतले असून, यामुळे दिल्ली-हावडा रेल्वे प्रवास कमालीचा वेगवान होणार आहे.
कळमना ते गोधनीदरम्यानच्या कॉर्ड लाईन
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नुकताच नागपूरचा विशेष दौरा केला. त्यांनी कळमना ते गोधनी दरम्यानच्या कॉर्ड लाईनची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेतला. सद्यस्थितीत या मार्गाचा वापर केवळ मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जात आहे. मात्र, नागपूर मुख्य स्थानकावरील प्रवासी गाड्यांची संख्या आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा संपूर्ण मार्ग आता प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीसाठी सज्ज केला जात आहे. महाव्यवस्थापकांनी सुरू असलेल्या कामाच्या गतीबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले असून, काम करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
दिल्ली आणि हावडा थेट जोडले जाणार
या नवीन बायपास मार्गामुळे देशातील देशातील दोन अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मार्ग म्हणजेच दिल्ली आणि हावडा थेट जोडले जाणार आहेत. दिल्लीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गाड्यांना नागपूर मुख्य स्थानकावर न आणता थेट गोधनी आणि कळमना मार्गे हावडाकडे वळवणे शक्य होणार आहे. तसेच, हावडाहून गोंदिया आणि कळमना मार्गे येणाऱ्या गाड्या नागपूर स्थानकावर न थांबता थेट गोधनीवरून दिल्लीकडे रवाना होतील. यामुळे रेल्वे कालावधीत इंजिन बदलण्याचा आणि दिशा बदलण्याचा खूप मोठा वेळ वाचणार असून प्रवाशांचा एकूण प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल.
दोन मोठे रेल्वे झोन थेट जोडले जाणार
भौगोलिकदृष्ट्या गोधनी हे मध्य रेल्वेचे नागपूर शहराच्या वेशीवर असलेले स्थानक आहे, तर कळमना हे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे स्थानक मानले जाते. हे दोन वेगवेगळे रेल्वे झोन या नव्या कॉर्ड लाईनमुळे थेट जोडले गेल्याने रेल्वेच्या संपूर्ण परिचालन व्यवस्थेला खूप मोठी मदत होणार आहे. प्रवासी गाड्या चालवण्यासाठी या मार्गावर सध्या ट्रॅकचे मोठ्या प्रमाणावर सक्षमीकरण केले जात आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग लक्षात घेऊन येथे अवजड क्षमतेचे आधुनिक स्विचेस बसवणे आणि उच्च दर्जाच्या गिट्टीचा वापर करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.
३१ जुलै २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी ३१ जुलै २०२८ ही अंतिम मुदत (डेडलाईन) निश्चित केली आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता या मार्गाचे संपूर्ण आधुनिकीकरण केले जात आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यानंतर नागपूरकरांना मुख्य स्थानकावरील प्रवाशांच्या प्रचंड गर्दीतून आणि कोलाहलातून मोठा दिलासा मिळणार आहे. त्याच वेळी देशभरातील प्रवाशांना नागपूर शहरात न अडकता थेट बाहेरून जाणाऱ्या एका नव्या, सुरक्षित आणि अत्यंत वेगवान बायपास प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.
