नागपूर : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात वन्यजीवांची वाढती संख्या, रोमांचक सफारी आणि आगामी प्रकल्पांमुळे पर्यटकांचे आकर्षण सतत वाढले आहे. या प्रकल्पात आणखी नव्या काही प्रकल्पाची भर पडणार आहे. तसे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वन्यजीव निरीक्षणाचा आनंद घेतल्यानंतर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची पाहणी व येथील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. यात त्यांनी वनराईत मुक्तपणे वावरणारे प्राणी-पक्षी पाहताना मनाला प्रसन्नता मिळाल्याचे नमुद केले आहे. या उद्यानाचा विकास आणि वन्यजीव संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. येथे रेस्क्यू सेंटरनंतर आता इंडियन सफारी सुरू झाली असून, पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘बिग फाईव्ह’ प्राण्यांमुळे ही सफारी पर्यटकांसाठी निश्चितच मोठे आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. सुमारे ६३ हेक्टर क्षेत्रात आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून, त्यात आफ्रिकेतील परिसंस्थेची प्रतिकृती उभारण्याबरोबरच वाहनातून सफारी आणि पायी चालण्याच्या मार्गाची सुविधा असेल. आफ्रिकन प्राणिसंग्रहालय, सफारी प्लाझा, प्राण्यांसाठी रुग्णालय व विलगीकरण केंद्र, सुशोभीकरण, वृक्षलागवड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी कामांचा यात समावेश आहे.
प्राण्यांच्या खरेदीवर ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित
सफारीमध्ये जिराफ, झेब्रा, इम्पाला, कुडू, ब्लू वाइल्डबीस्ट, पाणघोडा, शहामृग, आफ्रिकन सिंह, पांढरा गेंडा, चित्ता, ठिपकेदार तरस, चिंपांझी, बबून यांसह ३० हून अधिक आफ्रिकन प्रजाती आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्राण्यांच्या खरेदीवरच सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रवेशद्वार परिसरात खाद्यपदार्थांचे दालन, तिकीट केंद्र, माहिती केंद्र आणि पर्यटकांसाठी अन्य सुविधा उभारल्या जाणार आहेत. सुमारे सहा हेक्टर क्षेत्रावर १,९०० हून अधिक वाहनांची क्षमता असलेली वाहनतळाची सुविधाही प्रस्तावित आहे.
वनमंत्र्यांनी शनिवारी घेतला आढावा
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील प्रस्तावित आफ्रिकन सफारी प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला.
सुमारे ३५५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या गोरेवाडा झू लिमिटेड आणि राष्ट्रीय इमारत निर्माण महामंडळ (एनबीसीसी) यांच्यात जून २०२५ मध्ये सामंजस्य करार झाला. १८ महिन्यांत काम पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये सफारी सुरू करण्याचे नियोजन आहे.
