नागपूर : महाविद्यालयात प्रवेश घेऊन अवघे १५ दिवस झालेले असतानाच दोन विद्यार्थ्यांना वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली, जातिवाचक टिप्पणी केली आणि मद्याची बाटली फोडून तिचे काचेचे तुकडे उचलायला लावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रॅगिंगविरोधी समितीमार्फत चौकशी सुरू केली असून, अजनी पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय घडला?

शासकीय दंत महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांचे सत्र सुमारे १५ दिवसांपूर्वी सुरू झाले. त्यापैकी अनेक विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतात. कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था असतानाही २ नोव्हेंबरच्या सुमारास दोन कनिष्ठ विद्यार्थ्यांना वरिष्ठांनी एका ठिकाणी बोलावल्याचा आरोप आहे. तेथे त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच जातिवाचक टिप्पणी करून अपमानित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय मद्याची रिकामी बाटली फोडून तिचे काचेचे तुकडे उचलण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.

विद्यार्थ्यांना नेमका कशा प्रकारचा त्रास दिला?

वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांशी अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याची तक्रार आहे. जातिवाचक टिप्पणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मद्याची बाटली फोडून तिचे तुकडे उचलण्यास सांगितल्याचा प्रकार विशेष गंभीर मानला जात आहे. मात्र, या सर्व आरोपांचा लेखी तक्रारीत समावेश आहेच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जबाब आणि उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी केली जात आहे. चौकशीतूनच या घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

महाविद्यालय प्रशासनाने काय कारवाई केली?

विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने तातडीने रॅगिंगविरोधी समितीची बैठक घेतली. समितीमार्फत संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांच्या पालकांनाही ई-मेलद्वारे या प्रकरणाची माहिती देण्यात आली. तसेच अजनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

चौकशीसमोर कोणत्या अडचणी आहेत?

घटनेनंतर ३ नोव्हेंबरच्या सुमारास दिवाळीच्या सुट्यांमुळे वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी आपापल्या घरी गेले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक रजेवर असल्याने समितीच्या पुढील निर्णयांबाबतही अडचणी निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी अहवाल गुरुवारी प्रशासनाला सादर होणार असून, त्यानंतर समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

दोषींवर काय कारवाई होणार?

रॅगिंगविरोधी समितीच्या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. रितेश कळसकर यांनी तक्रार मिळताच चौकशी सुरू केल्याची माहिती दिली. सध्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार प्राप्त झाली असून, चौकशीनंतर नेमके काय घडले हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. नव्या महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आणि सुरक्षित वातावरणाचे आश्वासन मिळणे अपेक्षित असते. मात्र, वरिष्ठांकडून कनिष्ठांना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप समोर आल्याने महाविद्यालयीन वसतिगृहांतील रॅगिंगचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता चौकशी अहवालात काय निष्पन्न होते आणि प्रशासन दोषींवर कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.