नागपूर : विकास कामे, उपक्रम आणि उत्सवाच्या नावांवर हजारो कोटींचा निधी शासनाकडून खर्च करण्यात येतो. परंतु शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. .यावर निधीच खर्च होत नसून झाला तरी तो दिसून येत नाही.

नागपूर जिल्ह्यातील ४० शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही, तर ६७ शाळांमध्ये वीज नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री येथेच राहतात. दिग्गज मंत्री, नेते असतानाही शाळांची दुरावस्था असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यू-डायसनुसार जिल्ह्यात एकूण ३९५९ शाळा आहेत. त्यापैकी सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असल्याचा दावा केला जातो. ही बाब समाधानकारक असली तरी उर्वरित सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. ३८९२ शाळांमध्येच वीजपुरवठा उपलब्ध आहे, म्हणजेच अजूनही ६७ शाळा विजेविना आहेत. डिजिटल युगात वीज नसणे म्हणजे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवण्यासारखेच आहे. खेळाचे मैदान ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक बाब मानली जाते. मात्र, ३९५९ पैकी केवळ ३८४७ शाळांमध्येच मैदान आहे. म्हणजेच ११२ शाळांमध्ये खेळासाठी मैदानच नाही.

१७२० शाळांमध्येच अपंग विद्यार्थ्यांसाठी ‘रॅम्प’ची सुविधा

स्वच्छतागृहांच्या बाबतीतही परिस्थिती पूर्णपणे समाधानकारक नाही. ३८५१ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह आहे, तर ३९१९ शाळांमध्ये मुलींसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र, उर्वरित शाळांमध्ये अजूनही स्वच्छतागृह नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील केवळ १७२० शाळांमध्येच अपंग विद्यार्थ्यांसाठी ‘रॅम्प’ची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधींचा निधी सरकारकडून मिळतो. त्यानंतरही शाळांमध्ये मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने हा निधी नेमका कशावर खर्च करण्यात येतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळांमध्ये उपलब्ध सुविध

एकूण शाळा : ३९५९

व्यवस्था शाळांची संख्या
पिण्याचे पाणी ३९५९
वीज ३८९२
खेळाचे मैदान३८४७
मुलांसाठी स्वच्छतागृह३८५१
मुलींसाठी स्वच्छतागृह३९१९
अपंगांसाठी रॅम्प१७२०