नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार प्रा. अनिल सोले व माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र झाली होती. अखेर भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आज, रविवारी नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता प्रा. अनिल सोले काय करणार, याकडे लक्ष लागले आहे.

आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत विविध चर्चेला उत आला होता. माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि माजी आमदार सुधाकर कोहळे हे उमेदवारीच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात असतानाच आता सुधीर दिवे यांचेही नाव पुढे आले होते. या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आज सर्व चर्चेला व अंदाजावर पडदा पाडला. माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे कोहळे समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. परंतु आता भाजपापुढे उमेदवारीसाठी उत्सुक असलेले व समाज माध्यमावरून प्रचारही सुरू करणारे माजी आमदार प्रा. सोले यांचे मन वळविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

प्रा. सोले यांच्या समर्थकांनी ‘आमचं ठरलं’ अशा पोस्ट समाज माध्यमावर टाकून बंडखोरीचे संकेत दिले होते. त्यामुळे आता प्रा. सोले बंडखोरी करणार की पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून कोहळे यांच्यासाठी प्रचार करणार याकडे लक्ष लागले आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. मागील निवडणुकीत प्रथमच भाजपला येथे पराभव पत्करावा लागला होता. कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता. त्यानंतर मागील दीड वर्षांपासून या मतदारसंघात भाजपने मतदार नोंदणी आणि संघटनात्मक तयारीवर भर दिला आहे.

नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीतही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नोंदणीच्या शेवटच्या दिवशी, २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली. यात सर्व नगरसेवक, माजी नगरसेवकांना लक्ष्य देण्यात आले होते. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी यापूर्वी पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून या मतदारसंघातील संघटनात्मक संपर्काचा त्यांना अनुभव आहे. त्यानुए ते आपल्या अनुभवाचा आशीर्वाद कोहळे यांना देणार की नाराज होऊन घरी बसणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दुसरीकडे, माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी नोंदणीप्रमुख म्हणून गेल्या दीड वर्षांपासून परिश्रम घेत आहे. त्यांनी १ लाख ७५ हजार नोंदणी केली असल्याचे सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. आता त्यांची लढत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यासोबत राहणार आहे. या उमेदवारीसाठी कोहळे यांनी भाजपच्या केंद्रीय निवड समितीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

बावनकुळेंची ‘ती’ चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित

गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्षभरापूर्वीची एक चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. यात ते सुधाकर कोहळे यांची नोंदणीप्रमुख नियुक्ती झाली असून याचा अर्थ पुढे ते उमेदवार असू शकतात, असे संकेत देत आहेत. या चित्रफितीमुळे कोहळे समर्थक यांना विश्वास होता. अखेर त्यांच्या विश्वास पक्षाने कायम ठेवला.