नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून, काही उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांच्या निवडणूक शपथपत्रात देण्यात आली आहे.

सुधाकर कोहळे

भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावावर ३ कोटी ५८ लाख ५ हजार ५७३ रुपयांची जंगम आणि ५ कोटी ४३ लाख ६ हजार ९१३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे १८ लाख ३ हजार ८६० रुपये रोख तर पत्नीच्या नावावर १ कोटी ६५ लाख ५६ हजार १२२ रुपयांची जंगम आणि २ कोटी ५७ लाख ६१ हजार ५२७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे १६ लाख ३१ हजार १७ रुपये रोख आहे.

अनिल सोले

अपक्ष उमेदवार प्रा. अनिल सोले यांच्या शपथपत्रात २००१ मध्ये सक्करदरा आणि २००२ मध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यांच्या नावावर ९५ लाख ९१ हजार १३६ रुपयांची जंगम आणि ९३ लाख ७६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ६० हजार रुपये रोख आणि ५० ग्रॅम सोने आहे. सोले यांच्या पत्नीच्या नावावर २४ लाख ९८ हजार ९१७ रुपयांची जंगम आणि ४४ लाख ८० हजार ६२५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ५० हजार रुपये रोख आणि १७० ग्रॅम सोने आहे.

अभिजित वंजारी

काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्याविरुद्ध सीताबर्डी आणि सक्करदरा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. त्यांच्या नावावर ४१ हजार, तर पत्नीच्या नावावर १० हजार रुपये रोख आहेत. वंजारी यांच्या नावावर ५७ लाख १७ हजार ५९ रुपयांची बँक सुरक्षा ठेव आणि ५८ लाख ५३ हजार ९११ रुपयांचे शेअर्स आहेत. पत्नीच्या नावावर २३ लाख ४६ हजार ५३६ रुपयांची बँक सुरक्षा ठेव आणि १६ लाख ५० हजार १८३ रुपयांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आहे. अभिंजित यांच्याकडे १०० ग्रॅम, तर पत्नीच्या नावावर २५० ग्रॅम सोने आणि दोन किलो चांदी असल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे.