नागपूर : भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आज, रविवारी नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावाने उमेदवारी जाहीर केली. उमेदवारीसाठी भाजपचे माजी आमदार व याच मतदारसंघाचे एकदा प्रतिनिधित्व केलेले प्रा. अनिल सोले यांनीही प्रयत्न केले होते. किंबहुना समाजमाध्यमावरून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी प्रचारही सुरू केला होता. आता ते सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी नमुद केले.

प्रा. अनिल सोले यांचे ठरले, उमेदवारी अर्ज दाखल करणार

नागपूर पदवीधर मतदारसंघात माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्यानिमित्त शिस्तप्रिय भाजपला प्रथमच बंडखोरीची लागण झाली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. प्रा. अनिल सोले यांचे अत्यंत निकटवर्तीयांनी ते उद्या, सोमवारी दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. २०१४ मध्ये नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडले. त्यानंतर त्यांचे समर्थक असलेले प्रा. अनिल सोले या मतदारसंघातून निवडून आले. २०२० मध्ये त्यांना उमेदवारी नाकारून संदीप जोशी यांना भाजपने पदवीधरच्या रिंगणात उतरविले होते. ५८ वर्षांच्या भाजपच्या मक्तेदारीला बाजूला सारत या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी संदीप जोशी यांचा १८,९१० मतांनी पराभव केला आणि भाजपच्या गडाला सुरुंग लावला होता.

समाजमाध्यमावरून प्रचाराला आधीच सुरुवात

प्रा. अनिल सोले यांनी समाज माध्यमावरून प्रचारही सुरू केला होता. त्यांच्या नितटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या प्रा. सोले सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याने गडकरी, फडणवीस यांच्यापुढे त्यांचे मन वळविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रा. सोले यांच्या समर्थकांनी ‘आमचं ठरलं’ अशा पोस्ट समाज माध्यमावर टाकून बंडखोरीचे संकेत दिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते मागे घेणार की रिंगणात काय राहणार, फडणवीस, गडकरी यांना त्यांची नाराजी शमविण्यात यश येईल की नाही, असे अनेक राजकीय वर्तुळात विचारले जात आहे.

कोहळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सुधाकर कोहळे यांना दुपारी उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी गाठले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली असून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचे सुधाकर कोहळे यांनी नमुद केले. त्यांचा विश्वास माझ्यासाठी उर्जा व प्रेरणादायी आहे. पदवीधर मतदारांच्या अपेक्षा, प्रश्न आणि हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करत ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा माझा संकल्प आहे. मिळालेल्या या संधीचे रूपांतर सेवेत आणि जनविश्वासाचे रूपांतर कार्यातून सिद्ध करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे कोहळे म्हणाले.