नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत कॉ़ंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी दुसऱ्या पसंतीच्या मतांवर जिंकून आले. पहिल्या फेरीत ४ हजारांवर मतांनी आघाडीवर असलेले भाजपचे सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंका व्यक्त करीत चौकशीची गरज व्यक्त केली.
नेमके काय म्हणाले बावनकुळे?
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर महसूलमंत्री बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागपूरमधील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे बावनकुळे यांनी पुन्हा स्पष्ट केले. जिथे आम्ही हरतो, तिथे आम्ही शिकतो आणि त्या चुका सुधारून पुढील निवडणुकीत जिंकण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले. विरोधी पक्षातील मतदारांकडून काँग्रेसला दुसऱ्या पसंतीची मते मिळतील, याची अपेक्षा होती आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला, हे मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पदवीधर निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सुमारे पाच हजार मतांचा मोठा आणि सातत्यपूर्ण ट्रेंड दिसून आल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. या बाबीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एवढा मोठा ट्रेंड सातत्याने कसा राहू शकतो, याचा तपास होणे आवश्यक आहे. एका विशिष्ट पद्धतीने दुसऱ्या पसंतीची मते पडत असल्याचे दिसत असेल, तर त्यामागील बाबींची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी नमुद केले.
महायुतीतील वाचाळवीरांना पक्षांनी समज देण्याची गरज
विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील कामकाजाबाबत आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर संबंधित पक्षांनी आपल्या वाचाळवीरांना समज देण्याची गरज असल्याचे बावनकुळे म्हणाले. एकमेकांवर आरोप करून किंवा तोंडसुख घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे ते नकारात्मक दृष्टीने पाहतात. आरोप करणाऱ्यांना रोखणे शक्य नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ ऐतिहासिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला आनंद असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. २०१४ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष होते. त्यानंतर राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आणि महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न झाले. राज्याच्या जीडीपीमध्ये वाढ आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मागील बारा वर्षांत मोठे बदल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ प्रचंड आणि ऐतिहासिक आहे, असे बावनकुळे म्हणाले.
