पदवीधरमधील भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याआधी काही तथ्यात्मक गोष्टींची दखल घेणे आवश्यक. ‘काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याविषयी मतदारसंघामध्ये फारसे सकारात्मक वातावरण नव्हते. या पक्षाच्या नेत्यांमध्ये अजिबात एकवाक्यता नव्हती. वंजारींनी फोन केले नाही म्हणून अनेक नेते रुसून बसले होते. विजय वडेट्टीवारांनी तर प्रचार संपल्यावर त्यांच्या पराभवाचे संकेत जाहीरपणे दिले होते. अपवाद फक्त सुनील केदार व प्रफुल्ल गुडधेंचा. काही दिवसांपूर्वी जेनझी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. त्यात वंजारी कुठेच नव्हते. काँग्रेसकडून लढावे की लढू नये या द्विधा मनस्थितीत त्यांनी बराच वेळ वाया घालवला. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. प्रचारात ते एकदाही भाजपवर बरसले नाहीत. ऐन प्रचाराच्या काळात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वंजारींवर केलेल्या टीकेची चित्रफीत फिरली.’ हे जमिनीवरचे वास्तव दिसत असूनही सर्वशक्तीमान भाजपचा पराभव होत असेल तर त्याला काय म्हणावे? कायम जेत्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या या पक्षाकडे काय नाही? प्रचंड संघटनात्मक शक्ती आहे, झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे, मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आहे, रणनीती आखणारे तज्ज्ञ आहेत. समाजाच्या सर्व वर्गात पोहचलेला संघ परिवार आहे. तरीही पक्ष पराभूत झाला याचे एकमेव कारण अनेकांमध्ये आलेली सत्तेची झिंग आहे. सोबतच जुन्या व नव्यांमध्ये अंतर्गत पातळीवर उफाळून आलेला वाद आहे.

सर्वात आधी सत्तेच्या नशेविषयी. ‘पक्ष सर्वोपरी’ हे कधीकाळी पक्षातील प्रत्येकाचे ब्रीदवाक्य होते. आता ‘स्वहित सर्वोपरी’ या शब्दाने त्याची जागा घेतलेली. पक्षाची काळजी वाहणारे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे हे तिघे सोडले तर प्रत्येकजण या नव्या ब्रीदवाक्याला कवटाळून वेगाने धावत निघालाय. या शहरात डझनभर आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सज्जड दम देऊनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे प्रचारकाळात स्पष्टपणे दिसले. नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीने काँग्रेसचे वाटोळे केले. हे असेच सुरू राहिले तर भाजपही त्या मार्गाने जाईल हे निश्चित. एकदा स्वार्थ बळावला की माणूस आंधळा होतो. त्याची भाषा उद्दाम होते. यातल्या अनेक आमदारांची भाषा अशीच झालेली. सामान्य माणसांना हा माज वाटतो. त्यामुळे लाखोची नोंदणी करूनही त्याच मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. जनहित की कंत्राट असा पेच कायम सत्ताधाऱ्यांसमोर असतो. यातला सुवर्णमध्य प्रत्येकालाच साधता येत नाही. सततच्या विजयामुळे आंधळे झालेले हे आमदार कंत्राटधार्जिणे झालेले. अशी अवस्था एकदा पक्षात निर्माण झाली की कुणाचा पायपोस कुणात राहात नाही. पक्ष उद्दिष्टापासून दूर जातो. भाजपमध्ये नेमके हेच घडतेय. या पराभवामुळे पक्षाची किती नाचक्की होईल याची तमा यातल्या एकानेही बाळगली नाही.

याच मीमांसेतला दुसरा मुद्दा अनिल सोलेंचा. त्यांचे बंड व माघारीविषयी याआधी लिहून झालेले. तरी एक प्रश्न उरतोच. सोलेंची नाराजी आधी दूर का करण्यात आली नाही? ते रिंगणात राहिले तरी काही फरक पडत नाही असा समज कुणी करून घेतला? निवडणूक व्यवस्थापनात काटेकोर असलेला पक्ष नेमका इथे कसा चुकला? जी शिष्टाई नंतर केली गेली ती आधीच झाली असती तर नमनालाच अपशकून टळला असता. हे साधे राजकीय चातुर्य चाणक्यांची फौज असलेल्या पक्षाच्या लक्षात येऊ नये हे आश्चर्यच! परिणामी, सोलेंच्या माघारीनंतरही त्यांच्या बंडाचे कवित्व खास भाजपचे अशी ओळख असलेल्या मतदारांमध्ये कायम राहिले व त्याची परिणती चार हजार मते एकाच पद्धतीने अवैध करवून घेण्यात झाली. ही निश्चितच ‘स्मार्ट’ खेळी होती. भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर जे शह-काटशहाचे राजकारण चालते ते पाहू जाता यामागच्या सूत्रधाराचे नाव कधीच उघडकीस येणार नाही. या ‘अवैध’ प्रकरणाचा एक अर्थ असाही की काँग्रेससोबतच भाजपमधली एक शक्ती सुद्धा कोहळेंच्या पराभवासाठी काम करत होती. सत्ता दीर्घकाळ टिकली की गटबाजीला धुमारे फुटतात. भाजप आता या वळणावर उभा आहे. यासाठी दोन उदाहरणे पुरेशी बोलकी. आमदार प्रवीण दटके हे निवडणूक प्रमुख होते. त्यांना मुद्दाम ही जबाबदारी सोपवण्यात आली. पण मतमोजणीच्या दिवशी त्यांचीच प्रवेशिका तयार करण्यात आली नाही. ते पोलिसांशी हुज्जत घालत केंद्राबाहेर ताटकळत होते. प्रचारातल्या कामगिरीमुळे दटके वरिष्ठांच्या ‘रडार’वर आल्याने हे घडले का? पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी केंद्रावर येण्याऐवजी जवळच्या एका मंदिरात ठिय्या मांडून होते. ही दोन्ही दृश्ये बरीच बोलकी व पक्षात एकी ऐवजी बेकी कशी बळावत चालली हे दर्शवणारी. भाजप एकेकाळी शिक्षित व बुद्धिवंतांच्या वर्तुळात आदराचे स्थान असलेला पक्ष होता. आजही या पक्षात बुद्धिवान नेत्यांची कमतरता नाही. मात्र या पक्षाचे किती आमदार या वर्तुळात मानाचे स्थान टिकवून आहेत? या वर्तुळात त्यांचा नियमित वावर तरी असतो का? बौद्धिक मेजवानी देणाऱ्या किती कार्यक्रमांना ते हजर असतात? वास्तव हे की पक्षाच्या बहुतांश आमदारांचा या वर्तुळातला वावर संपला आहे. बहुतेकांना या वर्तुळाचे वावडे. अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर हा वावर फायदेशीर ठरत असतो. ही कमतरता या पक्षाला भोवली. केवळ नोंदणी केली म्हणजे पदवीधर आपल्या बाजूने येतील हा भाबडा आशावाद झाला. या पक्षातील आमदारांच्या वर्तुळात भलतेच लोक असतात. ज्यांचा या पद्धतीच्या निवडणुकांशी काडीचाही संबंध नसतो. अशांची फौज घेऊन सार्वत्रिक निवडणुका जिंकता येतात, या नाही. भाजपने शैक्षणिक वर्तुळात सक्रिय असलेल्या अनेकांना यावेळी कामाला लावले हे खरे पण त्यांची ताकद कमी पडली.

यातला तिसरा मुद्दा अतिआत्मविश्वासाचा. आपण पहिल्याच फेरीत निवडून येऊ, त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मागण्याची काही गरज नाही हे गृहीतक कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले? राज्यात सत्ता आहे म्हणजे जनमतही आपल्या बाजूने असा समज करून घेणे कधीही घातक. दीर्घकाळाची सत्ता असंतोषाला निमंत्रण देत असते. हे लक्षात घेऊन दुसऱ्या पसंतीच्या मताचे नियोजन करणे, त्यासाठी काही उमेदवार रिंगणात उतरवणे भाजपला सहज शक्य होते. गंमत म्हणजे अनेकदा पक्ष अशी खेळी करत आलेला. यावेळी याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. कोहळे वगळता एकही उमेदवार असा नव्हता ज्याची दुसरी पसंती पक्षाच्या पदरात पडेल. त्यामुळे सेक्युलर मतांचे विभाजन पहिल्या पसंतीत झाले पण दुसऱ्या वेळी तीच मते काँग्रेसच्या कामात आली. एकूणच हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा हे निश्चित. सर्व गोष्टी अनुकूल असताना ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा त्या दुसऱ्या फळीने दाखवलेला माज, त्यातून आलेला अहंगंड व घरातून झालेला भेद भाजपला पराभवाकडे घेऊन गेला. आता वेळ झाडाझडतीची!