नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ३,२७१ मतांनी पराभूत झाल्यानंतर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी थेट पदवीधरांनी मते देताना केलेल्या चुकीवरून नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत त्यांना ६३,९६० मते मिळाली असून विजयी अभिजित वंजारी यांना ६७,२३१ मते मिळाली. या निवडणुकीत १५ हजारांवर मते अवैध ठरली असून तीच मते पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे त्यांनी नमुद केले.

अपेक्षित मते मिळाली, पण….

पराभवानंतर ते त्यांच्या जानकीनगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार केला तर मी विजयी झालो. परंतु निवडणूक प्रक्रियेनुसार अभिजित वंजारी विजयी झाले, असे त्यांनी नमुद केले. भाजप कुठलीही निवडणूक संघटनेच्या बळावर लढते. बूथस्तरापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांप्रमाणे सर्वजण काम करतात. या निवडणुकीतही सर्व नेते, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्र्यांचे मोठे सहकार्य मिळाले. त्यांनी कार्यकर्त्यांसारखी मेहनत घेतली. त्यामुळे आम्हाला अपेक्षित मते मिळाली. मात्र विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले.

मतदारांची चूक भोवली, अवैध मतांमुळे पराभव

पदवीधर मतदारांनी मतपत्रिकेत माझ्या नावापुढे केवळ २ असा आकडा लिहिला. अशी ९ हजार मते अवैध ठरली. त्यामुळे मी पराभूत झालो. अन्यथा कोटा पूर्ण करून पहिल्याच पसंतीच्या मतांवर निवडून आलो असतो, असे कोहळे म्हणाले. नियोजनात कुठेही चूक नाही, मतदारांच्या हातून २ असा आकडा लिहून मोठी चूक झाली. त्यांच्या हातून झालेली चूक लोकशाहीची थट्टा आहे. या एका मताचा परिणाम विकास कामावर होतो, याची काळजी घेणे आवश्यक आहे. भविष्यात अशी चूक होऊ देऊ नका, विदर्भाच्या विकासाला हातभार लावा, असे आवाहन त्यांनी पदवीधर मतदारांना केले.

मित्र पक्षाची मिळाले सहकार्य

नागपूर विभागात राष्ट्रवादी, शिवसेना, पीरिपा, आठवले गटाने एकत्रित मेहनत घेतली. सर्वांनी सभा, बैठका घेतल्या. मित्र पक्षाची पूर्ण साथ मिळाली. परंतु पराभवावर नक्कीच चिंतन करू. या निवडणुकीचे विश्लेषण केले तर कॉंग्रेस ही दुसऱ्याच्या बळावर निवड़ून आली आहे. पहिल्या फेरीचे मते व अवैध मतांची संख्या बघितल्यास आमचे मत अधिक होतात असे त्यांनी सांगितले. 

वंजारींचे केले अभिनंदन पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार केला तर भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून मी विजय झालो असलो तरी निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार अभिजित वंजारी विजयी झाले, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. अपक्ष नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर स्वार होऊन अभिजित वंजारी यांनी ३,२७१ मतांनी विजय मिळवला.