नागपूर : भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांबद्दलची नाराजी, नव्या राजकीय पर्यायाची अपेक्षा आणि सीजेपी आंदोलनाशी जोडलेल्या जेन-झी मतदारांचा कल नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या बाजूने दिसून आला. त्यांच्या मतांची दुसऱ्या पसंतीनुसार झालेली विभागणीही लक्षवेधी ठरली आहे.

कराळे यांना २४ हजार २४९ मते

समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेले वर्ध्याचे नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना पहिल्या पसंतीची तब्बल २४ हजार २४९ मते मिळाली. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांवर नाराज असलेल्या मतदारांनी कराळे यांना पसंती दिल्याचे सांगितले जाते. विशेषतः नव्या पिढीतील जेन-झी मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय म्हणून कराळे यांच्याकडे पाहिल्याचे या मतदानातून दिसून येते.

सीजेपी आंदोलनाशी जोडलेल्या तरुणांचा पाठिंबा

काक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनाशी संबंधित जेन-झी तरुणांनीही कराळे यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे सांगितले जाते. पारंपरिक राजकीय पक्षांविषयीची नाराजी, बेरोजगारीसह विविध प्रश्न आणि राजकारणात नव्या पर्यायाची अपेक्षा या पार्श्वभूमीवर तरुणांनी अपक्ष उमेदवाराला पसंती दिल्याचे मानले जात आहे. भाजपपासून दूर जाणारा तरुण मतदार आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविषयीचा असंतोष या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.

दुसऱ्या पसंतीची ८,७२७ मते वंजारींना

कराळे यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांची आकडेवारी विशेष लक्षवेधी ठरली आहे. कराळे यांना पहिल्या पसंतीची २४ हजार २४९ मते मिळाली असताना, त्यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची १० हजार ९५३ मते पुढील उमेदवारांकडे हस्तांतरित झाली. यापैकी सर्वाधिक ८ हजार ७२७ मते काँग्रेसचे वंजारी यांना मिळाली, तर २ हजार २२६ मते कोहळे यांच्या पारड्यात पडली. त्यामुळे कराळे यांना पहिली पसंती देणाऱ्या मतदारांच्या दुसऱ्या पसंतीत काँग्रेसचे वंजारी आघाडीवर राहिल्याचे स्पष्ट होते.

दुसऱ्या पसंतीतून काँग्रेसला लाभ

कराळे यांना पहिली पसंती देणाऱ्या मतदारांनी दुसऱ्या पसंतीसाठी काँग्रेसचे वंजारी यांना सर्वाधिक कौल दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांबद्दल नाराजी व्यक्त करीत कराळे यांना पहिली पसंती देणाऱ्या मतदारांचा दुसऱ्या पसंतीचा कल मात्र काँग्रेसकडे झुकल्याचे आकडेवारीतून दिसते. कराळे यांच्या मतपत्रिकेवरील ८ हजार ७२७ मते वंजारी यांना, तर २ हजार २२६ मते कोहळे यांना मिळाली. त्यामुळे अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या मतांचा प्रभाव अन्य उमेदवारांच्या मतांच्या गणितावरही पडल्याचे दिसून येते. विशेषतः जेन-झी मतदारांचा हा कल आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.