नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय समितीने माजी आमदार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी जाहीर होताच नागपुरातच असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोहळे यांनी धाव घेतली. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना कोहळेंच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांसह शहर भाजपपुढे आहे.

कोहळे रामगिरीवर तासभर मुख्यमंत्र्यांसोबत

सुधाकर कोहळे यांना दुपारी उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी गाठले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार परिणय फुके, आमदार डॉ. राजीव पोद्दार, आमदार समीर मेघे, महापौर नीता ठाकरे, माजी आमदार सागर मेघे, माजी आमदार विकास कुंभारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली असून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचे सुधाकर कोहळे यांनी नमुद केले. त्यांचा विश्वास माझ्यासाठी उर्जा व प्रेरणादायी आहे. पदवीधर मतदारांच्या अपेक्षा, प्रश्न आणि हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करत ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा माझा संकल्प आहे. मिळालेल्या या संधीचे रूपांतर सेवेत आणि जनविश्वासाचे रूपांतर कार्यातून सिद्ध करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे कोहळे म्हणाले.

आता प्रा. अनिल सोले काय करणार?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत विविध चर्चेला उत आला होता. माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि माजी आमदार सुधाकर कोहळे हे उमेदवारीच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात असतानाच आता सुधीर दिवे यांचेही नाव पुढे आले होते. या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आज सर्व चर्चेला व अंदाजावर पडदा पाडला.

माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे कोहळे समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. परंतु आता भाजपापुढे उमेदवारीसाठी उत्सुक असलेले व समाज माध्यमावरून प्रचारही सुरू करणारे माजी आमदार प्रा. सोले यांचे मन वळविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. प्रा. सोले यांच्या समर्थकांनी ‘आमचं ठरलं’ अशा पोस्ट समाज माध्यमावर टाकून बंडखोरीचे संकेत दिले होते. त्यामुळे आता प्रा. सोले बंडखोरी करणार की पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून कोहळे यांच्यासाठी प्रचार करणार याकडे लक्ष लागले आहे.