नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाचे संभाव्य उमेदवार संजय थूल यांची सोमवारी नियोजित नामांकन रॅली ऐनवेळी रद्द झाली.
थूल यांच्या रॅलीची जय्यत तयारी
भारतीय महसूल सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी संजय थूल यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून बसपचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. त्यांनी मतदार नोंदणी अभियान राबविण्यासह निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली होती. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत थूल हेच पक्षाचे उमेदवार असतील, असे सांगितले होते.
सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी संविधान चौकातून रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने कार्यकर्ते संविधान चौकात जमले होते. मात्र, दुपारी अचानक ‘तांत्रिक कारणास्तव उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे,’ असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला. त्यानंतर बसपनेच विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.
पक्षाचा निवडणूक न लढण्याचा निर्णय
बसपचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी पक्षाने विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या निर्णयाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असून, पदाधिकाऱ्यांना इतर संघटनात्मक कामांवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बसपमधून उमेदवारी न मिळाल्यानंतर संजय थूल अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. थूल यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१४ मध्ये बसपला १८ हजारांहून अधिक मते
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बसपची यापूर्वीही भूमिका लक्षवेधी ठरली आहे. २०१४च्या निवडणुकीत बसपचे उमेदवार तथा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांना १८ हजार ५२६ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपचे अनिल सोले यांनी काँग्रेसचे बबनराव तायवाडे यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
२०२०च्या निवडणुकीतही बसपच्या उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. प्रशांत डेकाटे यांनी बसपचे उमेदवार म्हणून तयारी केली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या वेळी डेकाटे यांच्याऐवजी तीन जणांना ‘एबी’ फॉर्म देण्यात आल्याने पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता. तत्कालीन प्रदेश प्रभारी पीरसिंह आणि प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्या भूमिकेवरूनही चर्चा रंगली होती. अखेरीस बसप निवडणुकीच्या मैदानाबाहेर पडला होता. यंदाही ऐनवेळी बसपने निवडणुकीतून माघार घेतल्याने पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
