नागपूर : अपक्ष नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर स्वार होऊन अभिजित वंजारी यांनी विजयी झेंडा फडकवत विधान परिषदेतील मार्ग मोकळा केला. संपूर्ण यंत्रणा, कार्यकर्त्यांची मोठी फळी व नेत्यांच्या बैठकीच्या सत्रानंतरही भाजपचा पराभव झाला असून त्यांचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला परत मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या बळावर एकूण ६७,२३१ मते वंजारी यांच्या पारड्यात पडली. त्यांनी सुधाकर कोहळे यांना ३,२७१ मतांनी मागे टाकत भाजपचे बालेकिल्ला पुन्हा परत मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पार पडलेल्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या मतमोजणीचा निकाल तब्बल ४१ तासानंतर गुरुवारी पहाटे लागला असून सत्ताधारी भाजप महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत १,६५,६७२ पदवीधरांनी मतदान केले. यापैकी १,५०,८७४ मते वैध ठरली तर १५,०३२ मते अवैध ठरली. पहिल्या टप्प्यात ८४ हजार पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. यात अभिजित वंजारी यांना २८,९९८, सुधाकर कोहळे यांना २८,०७१, नितेश कराळे यांना अनपेक्षितपणे १४,७०८ मते मिळाली. वंजारी यांना ९२७ मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या टप्प्यात ८१,५३८ पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. यात वंजारी यांना २७,६००, कोहळे यांना ३२,८८३, नितेश कराळे यांना ९,५४१ मते मिळाली. यात कोहळे ५,२८३ मतांनी आघाडी घेतली. पहिल्या पसंतीच्या दोन्ही टप्प्यातील एकूण मतांपैकी वंजारी यांना ५६,६३०, कोहळे यांना ६०,९२४ मते पडली. कोहळे यांनी ४,२९४ मतांची आघाडी घेतली. परंतु नितेश कराळे यांनी २४,२४९ मते घेतल्याने पहिल्या पसंतीच्या आधारावर विजयी होण्यासाठी आवश्यक ७५,४३८ मतांचा कोटा कुणालाही पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निकालासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. बाद फेरीनुसार अपक्ष उमेदवारांचा त्यांना मिळालेल्या मतानुसार क्रम लावण्यात आला. त्यांच्या मतांच्या दुसऱ्या पसंतीचे मते इतर उमेदवारांच्या पारड्यात टाकण्यात आली. अशप्रकारे एक एक उमेदवार बाद झाले. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी कोहळे यांना पहिल्या पसंतीच्या आधारावर मिळालेल्या ४२९४ मतांच्या आघाडीवरून सुरू झाली. त्यामुळे प्रत्येक बाद फेरीने भाजप व काँग्रेस उमेदवारांची धाकधूक वाढवली. अखेर कराळे यांच्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी दोन दिवसानंतर निकाल लागला. वंजारी यांना ६७,२३१ मते मिळाली तर कोहळे यांना ६३,९६० मते मिळाली.
एकहाती विजय?
या निकालानंतर कोहळे यांच्यापेक्षा हा भाजपचा पराभव असल्याची चर्चा रंगली. कोहळे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार ते मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. त्या तुलनेत काँग्रेस नेत्यातील मतभेदामुळे वंजारी यांना एकहाती ही निवडणूक लढावी लागली. त्यामुळे हा अभिजित वंजारी यांचा विजय असल्याची चर्चा रंगली आहे.
सलग विजय, पकड घट्ट
५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांना ६१,७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२,७९१ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत १८,९१० मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. ही निवडणूक त्या तुलनेत चुरशीची झाली. केवळ ३,२७१ मतांनी विजय मिळाला. असे असले तरी सलग विजयाने मतदारसंघावर काँग्रेसची पकड घट्ट तर भाजपची सैल होत असल्याची चर्चा रंगली आहे.
अशी पडली मते
पहिला टप्पा, पहिल्या पसंतीची मते
- अभिजित वंजारी — २८,९९८
- सुधाकर कोहळे — २८,०७१
- नितेश कराळे — १४,७०८
- वंजारी यांना ९२७ मतांची आघाडी
दुसरा टप्पा, पहिल्या पसंतीची मते
- अभिजित वंजारी — २७,६००
- सुधाकर कोहळे — ३२,८८३
- नितेश कराळे — ९,५४१
- कोहळे यांना ५,२८३ मतांची आघाडी
पहिल्या पसंतीची एकूण मते
- अभिजित वंजारी — ५६,६३०
- सुधाकर कोहळे — ६०,९२४
- नितेश कराळे — २४,२४९
- कोहळे यांना ४,२९४ मतांची आघाडी
पहिल्या व दुसऱ्या पसंतीची एकूण मते
- अभिजित वंजारी — ६७,२३१
- सुधाकर कोहळे — ६३,९६०
- वंजारी ३,२७१ मतांनी विजयी
