नागपूर: पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या क्रमांक आघाडी घेतल्यावरही भाजपचे उमेदवार सुधारक कोहळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना विजय मिळाला. दुसऱ्या क्रमांकाच्या मताकडे दुर्लक्ष करणे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना भोवले.

ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. अनिले सोले यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोलेंना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु सोलेंनी भेट नाकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कोहळेंना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोलेंची भेट घेऊन नाराजी दूर केली. सोलेंनी उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने मतदानाच्या पूर्वसंध्येपासून मुख्यमंत्री नागपुरात डेरेदाखल होते. सहाही जिल्ह्यात प्रचार करण्यात आला. दुसऱ्या पसंतीक्रमांच्या मताचे महत्त्व भाजपला माहिती असूनही या निवडणुकीत फक्त पहिल्या पसंतीक्रमांचे मतांसाठी प्रचार केला. त्याचा फायदाही झाला. पहिल्या पसंतीचे मत त्यांनाच जास्त मिळाली. ४,२९४ मतांची त्यांना आघाडी होती. परंतु कोटा पूर्ण न करता आल्याने दुसऱ्या पसंतीच्या क्रमांची माजणी करण्यात आली. यातच ते मागे राहिले आणि त्यांचा पराभव झाला.

सर्वाधिक कमी मते असल्यांपासून सुरुवात

सर्वाधिक कमी मते असलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतापासून मोजणी सुरू करण्यात आली. शेवटी नितेश कराळे यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांची मोजणी झाली. यात सर्वाधिक मते कॉंग्रेसचे वंजारी यांना मिळाले. विशेषतः कराळे यांचे मोठ्या प्रमाणात मते मिळाली. कराळेंची दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ८७२६ मते वंजारींना मिळाली. तर कोहळेंना २२२६ मते मिळाली. आणि विजयाचे गणितच बदलले. कोहळेंपेक्षा वंजारी ३२७१ मतांनी पुढे गेले. त्यामुळे विजयाचा ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण न करताही विजयी घोषित करण्यात आले.