नागपूर : नागपूर विभाग पदवीधर निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. ४५ तासांपेक्षा जास्त काळ मतमोजणीची प्रक्रिया चालली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे यांनी चार हजारांवर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण होते. परंतु ते काही फार काळ टिकू शकले नाही. दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतांनी त्यांच्या आघाडीत बिघाडी केली. नितेश कराळे यांचे दुसऱ्या क्रमांकाचे मते भाजपचे सुधाकर कोहळे आणि कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी या दोघांनाही गेली. कराळे यांनाही इतर उमेदवारांची दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
पहिल्या पसंतीत आघाडी
या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २.५५ लाखांवर मतदारांची नोंदणी झाली होती. तर १ लाख ६५ हजार ९०६ मतदान केले. यातील १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. यात पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६०९२४ मते सुधाकर कोहळे यांना मिळाली. त्या पाठोपाठ अभिजीत वंजारी यांना ५६६३० मते तर अपक्ष नितेश कराळे यांना २४,२४९ मते मिळाली. काेहळे यांना पहिल्या पसंतीच्या क्रमात ४,२९४ मतांची आघाडी होती.
मोजणीच्या वेळी कराळेंच्या मतांचीच चर्चा
निवडणुकीत मोजणीच्या वेळी फक्त नितेश कराळेंचीच चर्चा होती. त्यांना मिळणाऱ्या मतांकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी सर्वांचाच अंदाज चुकवला. आणि अपेक्षापेक्षा दुपटीवर गेले. त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा समोर आल्यानंतर त्यांचे दुसऱ्या पसंतीचे मते कुणाला किती जातील, याची चर्चा सुरू झाली. कराळे यांना पहिल्या पसंतीची २४,२४९ मते मिळाली. तर दुसऱ्या पसंतीची १८१७ मते मिळाली. त्यामुळे त्यांना एकूण २६, ०६६ मते मिळाली. त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते कुणाला जातील याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. कराळेंची सर्वच मते इतर उमदेवारांकडे हस्तांतरित झाली नाही. अनेक मतदारांना त्यांना एकच पसंतीचे मत दिले. त्यांचे दुसऱ्या पसंतीचे १०,९५३ मते कोहळे आणि वंजारींकडे हस्तांतरित झाले. यातील ८७२७ मते वंजारींना मिळाली. तर कोहळेंना २२२६ मते मिळाली आणि विजयाचे गणितच बदलले. कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतांमुळे मागे असलेले वंजारी ३२७१ मतांनी पुढे गेले. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
