नागपूर : मागील वर्षी राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. औरंगजेबाची कबर हटवा, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. आता नागपुरात ‘आलमगीर औरंगजेब’ प्रवेशद्वार चर्चेत आले असून नाव कायमचे मिटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महापालिका व पोलिसात यावरून तक्रार करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्याचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागपुरात कुठे आहे औरंगजेबाच्या नावाचे प्रवेशद्वार?
नागपुरात मोमीनपुरा, टेका नाका, जाफरनगर, हसनबाग, ताजबाग असे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. यातील हसनबाग परिसरातील प्रवेशद्वारावर ‘आलमगीर औरंगजेब’ असे लिहिले आहे. प्रवेशद्वारावर ते कुणी लिहिले, याचा अद्याप पत्ता नाही. परंतु त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला, इतिहासाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध करणाऱ्या क्रूर औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
भाजयुमोने केली कारवाईची मागणी
प्रवेशद्वारावर औरंगजेबाच्या नावावरून भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. ते नाव त्वरित हटवून ते लिहिणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी व आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला, इतिहासाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध करणाऱ्या क्रूर औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्रात औरंगजेबाचे नाव घेणाऱ्यांना किंवा त्याचे गौरवगीत करणाऱ्यांना कोणतीही जागा नाही, ही जनभावना लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाने हसनबाग परिसरातील प्रवेशद्वारावर लिहिण्यात आलेल्या ‘आलमगीर औरंगजेब’ या नाव कायमचे हटविण्याची मागणी उपमहापौर लिला हाथीबेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पोलिसांना आंदोलनाचा इशारा
प्रवेशद्वारावर औरंगजेबाचे नाव पुन्हा लिहिले जाऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि अशाप्रकारे नाव लिहिणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत नंदनवन पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांनाही भाजयुमोद्वारे निवेदन देण्यात आले. नाव लिहिणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा युवामोर्चा तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी शुभम मुंडले, संजोग हरडे, बादल दुबे, यश गायकवाड, तुषार ठाकरे, संपर्क प्रमुख सार्थक दारुणकर, सहसंपर्क प्रमुख स्वप्नील कुकडे, युवती प्रमुख मोना पराते, वॉर्ड अध्यक्ष हर्षल कामडी, विनय साहू, स्वप्नील निकोसे, राज मेंढे, हेमांग पटेल, मिहिर पटेल, निखिल सिन्हा, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्य गोडे तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आक्रमणकारी औरंगजेबाचे कोणत्याही स्वरूपातील उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. नागपूरसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरातील सार्वजनिक ठिकाण असलेल्या द्वारावरील औरंगजेबाचे नाव तात्काळ हटवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात नागपुरात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडल्यास भारतीय जनता युवा मोर्चा स्वस्थ बसणार नाही. जनभावनांचा आदर राखत अशा प्रवृत्तींविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाने दिला.
