Nagpur Heatwave News: नागपूर : शहरात तापमानाचा पारा सातत्याने ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत असताना उष्णतेचा परिणाम आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १ मार्च ते १७ मे २०२६ या कालावधीत उष्णतेशी संबंधित त्रासामुळे तब्बल ७६ नागरिकांनी उपचार घेतले. त्वचेवर पुरळ, शरीरातील पाण्याची कमतरता, स्नायूंमध्ये गोळे येणे आणि चक्कर येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. मात्र, एवढ्या तीव्र उष्णतेतही एकाही उष्माघातग्रस्त रुग्णाची नोंद नसल्याने महापालिकेच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात नेमके किती रुग्ण आढळले?
महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य व कल्याण केंद्रे, मनपा रुग्णालये आणि ‘आपला दवाखाना’ येथे मिळून ३ लाख २८ हजार ७१२ नागरिकांनी उपचार घेतले. त्यापैकी ७६ जणांना उष्णतेशी संबंधित त्रास झाल्याची नोंद करण्यात आली.
कोणत्या तक्रारी सर्वाधिक?
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ३६ नागरिकांना त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास झाला. त्यानंतर २० जणांना शरीरातील पाण्याची कमतरता, १४ जणांना स्नायूंमध्ये गोळे येणे आणि ६ जणांना चक्कर येण्याची समस्या उद्भवली.
उष्माघाताचा एकही रुग्ण नाही?
नागपुरात एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाने विक्रमी पातळी गाठली. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असतानाही महापालिकेच्या नोंदीत एकही उष्माघातग्रस्त रुग्ण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची नोंद योग्य पद्धतीने होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोणाला बसतोय उष्णतेचा सर्वाधिक फटका?
खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम मजूर, वाहतूक कर्मचारी आणि मैदानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. दुपारच्या वेळेत निर्जलीकरण, अशक्तपणा आणि चक्कर येण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महापालिकेने नागरिकांना काय आवाहन केले?
आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, हलका आहार घेणे आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उष्णतेशी संबंधित रुग्णांची आकडेवारी
- त्वचेवर पुरळ : ३६
- शरीरातील पाण्याची कमतरता : २०
- स्नायूंमध्ये गोळे येणे : १४
- चक्कर येणे : ६
- उष्माघात : ०
- एकूण रुग्ण : ७६
कुठे किती बाह्यरुग्ण तपासणी?
- शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे : १ लाख ६१ हजार ९९८
- शहरी आरोग्य व कल्याण केंद्रे : १ लाख ३५ हजार ७१३
- मनपा रुग्णालये : ९ हजार २७३
- ‘आपला दवाखाना’ : २१ हजार ७२८
- एकूण बाह्यरुग्ण तपासणी : ३ लाख २८ हजार ७१२
